गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) वास्को येथील टिळक मैदानावर शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यात कोलकाता डर्बीची लढत होत आहे. जगातील एक ऐतिहासिक डर्बी तसेच भारतीय फुटबॉलमधील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतीत एससी ईस्ट बंगालचे रॉबी फाऊलर आणि एटीके मोहन बागानचे अँटोनिओ लोपेझ हबास यांची मदार अनुभवावर असेल.
भारतामधील अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेत हे दोन बलाढ्य संघ सहभागी झाल्यामुळे संपूर्ण फुटबॉल जगतामध्ये या लढतीविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.
लिव्हरपूल एफसीचे माजी खेळाडू रॉबी फाऊलर यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर ईस्ट बंगालने संघात समुळ बदल केले आहेत. आपल्या मोहिमेची विजयी सुरवात करण्याचे त्यांचे ध्येय असेल. ईस्ट बंगालकडे जेजे लालपेखलुआ, युजीन्सन लिंगडोह आणि बलवंत सिंग अशा प्रतिभाशाली भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची ही फळी भक्कम वाटते. परदेशी खेळाडूंत संघाचे डॅनिएल फॉक्स असून त्याच्याकडे संघाचे नेतृत्व आहे. त्याच्या जोडीला अँथनी पिल्किंग्टन आणि जेक्स मॅघोमा असे अनुभवी तारे आहेत. यामुळे मुख्य प्रशिक्षक म्हणून दुसरी खेळी सुरु करताना फाऊलर यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.
45 वर्षीय फाऊलर यांनी सांगितले की, आमच्या संघात कर्णधार बरेच आहेत, डॅनिएल हा तर कर्णधारांचा कर्णधार आहे. त्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. भव्य डर्बीच्या रुपातील पहिल्या सामन्याची तयारी करीत असताना आमच्या संघाला प्रगतीपथावर नेण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धी त्याच्याकडे आहे. त्याच्याबरोबर माझा चांगला संवाद झाला आहे. इतर कोणत्याही खेळाडूप्रमाणेच संघासाठी अपेक्षित कामगिरी साध्य करण्याची जिगर त्याच्याकडे आहे.
इंग्लंडच्या फाऊलर यांची हबास यांच्यासमोर कडवी कसोटी लागलेली असेल. हबास चौथ्या वेळी आयएसएल मोसमात सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता नाही. त्यांच्या खात्यातत दोन विजेतिपदे जमा आहेत. संघाची भक्कम खोली बघता हबास यांच्या संघाचे पारडे जड असेल.
एटीके मोहन बागानने केरला ब्लास्टर्सवर 1-0 असा निसटता विजय मिळवून मोहिमेला विजयी प्रारंभ केला आहे. मोसम पुढे सरकत असताना कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा विजय त्यांच्यासाठी लय गवसण्यास प्रेरक ठरेल.
हबास यांनी सांगितले की, डर्बी हा एक खास सामना असतो. माझ्यासाठी डर्बी महत्त्वाची आहे, कारण कोलकत्यामधील फुटबॉलप्रेमाची तीव्रता आणि त्यांच्यासाठी असलेले डर्बीचे महत्त्व मला ठाऊक आहे. आम्हाला खेळाविषयी आदर बाळगून चाहत्यांसाठी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
सिटी ऑफ जॉय असे संबोधले जाणाऱ्या कोलकात्यामधील या प्रतिष्ठेच्या लढतीत श्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठीच्या ऐतिहासिक चुरशीला नवे व्यासपीठ मिळेल आणि त्याचबरोबर नव्या युगाचा आरंभ होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०: नॉर्थईस्टची दोन गोलांच्या पिछाडीवरून ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी
भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात
“एक दिवस आकाशात फुटबॉल खेळूया”, मॅराडोना यांना पेलेंची अनोखी श्रद्धांजली