भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ओमान व संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटर (मार्गदर्शक) बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्याचे अनेकांकडून कौतुक होतेय. आता यामध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याची देखील भर पडली आहे.
सेहवागने केले धोनीचे कौतुक
भारतीय संघाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोनीचा भारतीय संघातील सहकारी व धोनी कर्णधार असताना उपकर्णधारपद भूषवलेल्या वीरेंद्र सेहवागने देखील आता त्याचे गुणगान गायले. तो म्हणाला,
“धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांचा कर्णधार राहिला आहे. विश्वचषकात बुमराहसह सर्व भारतीय गोलंदाजांना त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांची मनस्थिती समजण्यात धोनीचा हातखंडा आहे.”
सेहवाग पुढे म्हणाला,
“यष्टीरक्षक म्हणून योग्य क्षेत्ररक्षण लावण्यात धोनी वाकबगार होता. ही गोष्ट भारतीय संघाला लाभदायी ठरेल. धोनी गोलंदाजांच्या योजना समजून फलंदाजांना मदत करेल. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी धोनीपेक्षा योग्य कोणीही नाही. तो युवा खेळाडूंच्या समस्यांचे योग्य निराकरण करेल.”
अनेकदा धोनी आणि सेहवाग यांचे मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, सेहवागला अनेकदा धोनीची स्तुती करताना पाहिले गेले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर.अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी.
राखीव- शार्दुल ठाकूर, दीपक चाहर व श्रेयस अय्यर.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी ‘हे’ चार युवा खेळाडू असतील प्रमुख दावेदार
कुंबळेंच्या नेतृत्वात विराटची बॅट ओकते आग, वाचा ही जबरदस्त आकडेवारी