श्रमिक जिमखाना, मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत काल उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. महिला विभागात महात्मा गांधी स्पो, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती, सुवर्ण युग तर पुरुष विभागात महिंद्रा अँड महिंद्रा, मध्य रेल्वे, मुंबई बंदर, देना बँक संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिला विभागात झालेल्या पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना महात्मा गांधी स्पो विरुद्ध डॉ. शिरोडकर स्पो यांच्यात झाला. डॉ. शिरोडकर स्पो ने महात्मा गांधी स्पो संघाला चांगली टक्कर दिली. मध्यंतरा पर्यत १८-१३ अशी आघाडी महात्मा गांधी स्पो कडे होती. पण उत्तरार्धात महात्मा गांधी स्पो खेळाडूंनी केलेल्या वारंवार चुका मुळे सामन्यांत चुरस वाढली.
मेघा कदम व सेन्हा गुप्ताच्या उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला. शेवटच्या मिनिटा आधी मेघा कदमची झालेली पकडीने सामना महात्मा गांधी स्पो ने ३६-३२ असा जिंकला. मीनल जाधव व तृप्ती सोनावने यांनी चांगला खेळ केला. महात्मा गांधी स्पो च्या विजयात राष्ट्रीय प्रशिक्षक सुहास जोशी याचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं.
तर दुसऱ्या सामन्यांत राजमाता जिजाऊ संघाने स्वराज्य स्पो वर ४४-०७ असा एकहाती विजत मिळवत उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती संघाने शिवतेजवर ३५-०८ असा विजय मिळवला. सुवर्ण युग विरुद्ध जय हनुमान बाचणी यांच्यात चांगली लढत झाली. शेवटच्या काही मिनिटांत बाचणी संघाकडून चुका झाल्यामुळे सुवर्ण युग संघाने २७-२१ अशी बाजी मारली.
पुरुष विभागात एयर इंडिया विरुद्ध देना बँक यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत थरार अनुभवाला मिळाला. मध्यंतरा पर्यत १९-१८ अशी शुल्लक आघाडी देना बँक कडे होती. नितीन देशमुख, श्रेयस काकडे, राजू कथोरे यांच्या उत्कृष्ट खेळांच्या जोरावर देना बँक संघाने ४३-३५ अशी बाजी मारली. या मोसमात पहिल्यादाचं एयर इंडिया अंतिम सामन्याच्या आधीच स्पर्धेतून बाहेर पडले.
तर सेन्ट्रल रेल्वेने न्यु इंडिया इन्शुरन्स संघाचा ३१-२१ असा पराभव केला. तर महिंद्राने मुंबई पोलिसाला २७-०८ असे नमवले. मुंबई बंदर विरुद्ध बी.ई.जी. यांच्यात चांगली लढत झाली. मध्यंतरा पर्यत १५-११ अशी आघाडी मुंबई बंदर कडे होती. अरविंद देशमुख, स्मितील पाटील व किरण मगर यांच्या खेळाच्या जोरावर मुंबई बंदरने ३५-२९ अशी बाजी मारली.
आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने रंगणार आहेत. महिला विभागात महात्मा गांधी स्पो समोर बलाढ्य राजमाता जिजाऊ पुणे संघाचे कडवे आव्हान असणार आहे. तर सुवर्णयुग पुणे संघ शिवशक्ती महिला संघाशी दोन हात करेल. तर पुरुष विभागात अनुभवी महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध देना बँक यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. मुंबई बंदर समोर मध्य रेल्वेचे कडवे आव्हान असणार आहे.
उपांत्य सामने (महिला)
१) महात्मा गांधी स्पो विरुद्ध राजमाता जिजाऊ
२) शिवशक्ती विरुद्ध सुवर्ण युग
उपांत्य सामने (पुरुष)
१) महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध देना बँक
२) मध्य रेल्वे विरुद्ध मुंबई बंदर