भारत आणि इंग्लंड संघात आजपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे पहिला कसोटी सामना चालू झाला आहे. या सामन्यापुर्वी अक्षर पटेलच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर याला दुखापतीमुळे सामना खेळण्यापुर्वीच संघातून बाहेर पडावे लागले. त्यामुळे अक्षरऐवजी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम याला अंतिम ११ जणांच्या पथकात सहभागी करण्यात आले. यासह नदीमने जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय कसोटी पुनरागमन केले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात १९ ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे नदीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी १५ जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. परंतू कुलदीप यादव खांद्याच्या दुखापतीने तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्याने त्याची बदली खेळाडू म्हणून सामन्याच्या एका दिवसाआधी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
या निवडीनंतर जवळपास १४ तासांनंतर लगेचच त्याला ११ जणांच्या भारतीय संघातही संधी मिळाली होती. नदीमने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर आता चेन्नई कसोटीत अष्टपैलू अक्षरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले होते. परंतु त्याच्या डाव्या पायाचा गुडघा जखमी झाल्याने त्याला संघाबाहेर ठेवावे लागले. अशात संघ व्यवस्थापनाने अक्षरऐवजी नदीमला संघात जोडले. थोडक्यात सांगायचे झाले तर, नदीमला दोन्ही वेळा कोणत्या-ना-कोणत्या खेळाडूच्या दुखापतीमुळे संघात जागा देण्यात आली आहे.
जरी नदीम आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिभा दाखवू शकला नसेल तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे.
क्रिकेट कारकिर्दीत घेतल्या ७०० हून जास्त विकेट्स
फिरकी गोलंदाज असलेल्या शाहबाज नदीमने १७ वर्षांपूर्वी डिसेंबर २००४ मध्ये झारखंडकडून केरळ विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २ विकेट्स आणि २५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या सामन्यात झारखंडकडून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीही खेळत होता.
नदीमने मागील १७ वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तसेच त्याने भारत अ संघाकडून खेळतानाही चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. त्याने आत्तापर्यंत ११७ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फलंदाजी करताना २१९६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.
तसेच त्याने १०९ अ दर्जाच्या सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच देशांतर्गत टी२० लीगमध्ये १३४ सामन्यात ११० विकेट्स काढल्या आहेत. एवढेच नव्हे तर, आयपीएलमध्ये ७१ सामने खेळताना त्याने ४७ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. अर्थात नदीमने त्याच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत ७०० पेक्षा जास्त विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ क्षण कधीच विसरू शकणार नाही, ज्यावेळी मी रडलो होतो, भुवनेश्वर कुमारने शेअर केली आठवण