टी२० विश्वचषकातील बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान खेळला गेला. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गड्यांनी मोठा विजय मिळवला. यासह पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध कधीही विजय न मिळवण्याची साखळी खंडित केली. याच सामन्यानंतर पाकिस्तान संघातील युवा वेगवान गोलंदाज शहानवाज धनी याने भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याच्यासोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे.
धनीने केले ट्विट
पाकिस्तानने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते आनंदात होते. या विजयानंतर पाकिस्तानचे काही खेळाडू भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याच्याशी चर्चा करताना दिसले. यामध्ये कर्णधार बाबर आझम, अनुभवी शोएब मलिक व इमाद वसिम यांचा समावेश होता. त्यानंतर पाकिस्तान संघासह या विश्वचषकासाठी नेट बॉलर म्हणून असलेला शहानवाज धनी हा धोनीसह चर्चा करताना दिसला. धनी याने धोनीसह एक छायाचित्र घेत ट्विट केले. त्याने लिहिले,
‘ही रात्र खास होती. पाकिस्तानचे विजयाचा आनंद तसेच माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असलेल्या एमएस धोनी यांच्याशी भेट झाली. हे कधीही विसरणार नाही.’
what a night it was, Happiness of Pakistan's Victory and excitement of meeting one of my dream player @msdhoni can't be forgotten.❤️🤙🤙 pic.twitter.com/CWQjm4vDKa
— Shahnawaz Dahani (@ShahnawazDahani) October 25, 2021
त्याच्या या छायाचित्रात चांगलीच पसंती लाभत आहे. अनेक भारतीय चाहते तसेच पाकिस्तानी चाहते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाकिस्तानचा भारतावर दणदणीत विजय
तब्बल २९ वर्ष आणि विश्वचषकातील १२ सामन्यांनंतर पाकिस्तानने भारतीय संघाला विश्वचषकातील सामन्यात पराभूत केले. भारताने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी नाबाद खेळ्या करत संघाला १० गड्यांनी अविस्मरणीय विजय मिळवून दिला. यासह पाकिस्तानने आपल्या विश्वचषकात मोहिमेची सुरवात विजयाने केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलाव, नवीन संघ, स्पर्धेचे स्वरूप आणखी खूप काही; जाणून घ्या आयपीएल २०२२ मध्ये काय बदल होणार?
सबका बदला लेगा माही! आयपीएलमध्ये रंगणार चेन्नई विरुद्ध लखनौचे नवे द्वंद; ‘हे’ आहे कारण
अफगानी फलंदाजाचा हुबेहूब धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, इंग्लंडची महिला क्रिकेटरही चकित- व्हिडिओ