भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या आक्रमक फलंदाजी सोबतच यष्टीमागून करीत असलेल्या विनोदी कमेंटसाठी देखील प्रसिद्ध आहे. रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडची जुगलबंदी अनेकवेळा चाहत्यांना सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेत बघायला मिळते.ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही पंतने वेड फलंदाजी करत असताना आपली शेरेबाजी सुरू ठेवली होती. मात्र, या दरम्यानच समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियन दिगज मार्क वॉ व शेन वॉर्न पंतवर भडकताना दिसले.
रिषभ पंत वेडशी संभाषण करत असताना मार्क वॉ म्हणाले, “मला किपरच्या बोलण्याबद्दल काहीही आक्षेप नाही. पण जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतोय तेव्हा शांत बसणे योग्य आहे. माझ्यामते अंपयरांनी याबद्दल दखल घेणे गरजेचे आहे. खेळाडू यात काहीही करू शकत नाही.”
वॉ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वॉर्न म्हणाले ,” पंतला विपक्षी खेळाडूंशी संभाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यास तयार असतो, तेव्हा असे करणे चुकीचे आहे. गोलंदाज रन अप घेण्यास सुरुवात करतो, तेव्हा किपरने शांत असणे गरजेचे आहे, असे नसेल तर फलंदाजाच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.”
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून, ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावत 274 धावांपर्यंत मजल मारली आहे. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतकडून फलंदाजीत उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून नॅथन लायनला चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने दिला गार्ड ऑफ ऑनर
कारकिर्दीतील १८ वे शतक करत जो रुटने केला मोठा रेकॉर्ड, ‘या’ दिग्गजांच्या यादीत झाला सामील
रोहित शर्माला गोलंदाजी करताना पाहून दिनेश कार्तिकने ‘या’ दोन गोलंदाजाना दिली चेतावणी