शार्दुल ठाकूरने गेल्या एका वर्षात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी दाखवली आहे. त्याने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. शार्दुलने २ कसोटीत ७ बळी घेतले तसेच दोन अर्धशतके केली. या कामगिरीनंतर त्याने टी -२० विश्वचषकाच्या संघात निवड होण्याची आशा व्यक्त केली होती. मात्र, जेव्हा बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा त्याचा १५ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता.
शार्दुलची श्रेयस अय्यर आणि दीपक चाहरसह राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. यामुळे तो निराश झाला आहेत. त्याला वाटते की एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमधील त्याची कामगिरी गेल्या काही वर्षांत चांगली झाली आहे. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शार्दुलने एका दैनिकाशी बोलतांना सांगितले की, ‘हो, टी-२० विश्वचषकाच्या संघात माझी निवड न झाल्याने मी थोडा निराश झालो आहे. देशासाठी खेळणे आणि विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पण, जर तुम्ही पाहिले तर मी गेल्या दोन वर्षात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. आता मी विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून निवडला गेलो आहे, म्हणून मला वाटते की, मला तयार राहावे लागेल. मला कधीही बोलावणे येऊ शकते.’
भारताचा हा स्टार वेगवान गोलंदाज सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आयपीएलनंतर लगेचच टी -२० विश्वचषक खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत शार्दुलला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टी -२० विश्वचषक संघात सामील होण्याची चांगली संधी आहे. मात्र, स्पर्धेच्या पूर्वार्धात तो चेन्नई सुपर किंग्ससाठी फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यांमध्ये शार्दुलने १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटसह फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत. तरीही, सध्या त्याचा फॉर्म चांगला आहे, त्यामुळे एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा असतील. दरम्यान, सीएसके १ सप्टेंबर रोजी दुबईत गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला भारतीय संघाचा मेंटर बनविल्यानंतर आली वीरूची प्रतिक्रिया, म्हणाला…
विराटच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘जर आपण टी२० विश्वचषक जिंकला तर…’
भारतीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी ‘हे’ चार युवा खेळाडू असतील प्रमुख दावेदार