मुंबई आणि भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने अखेर १० क्रमांकाच्या जर्सीला रामराम ठोकला आहे. शार्दुलने मागील महिन्यात श्रीलंकामध्ये त्याचे वनडे पदार्पण केले तेव्हा त्याने १० क्रमांकाची जर्सी घातली होती. पण आता त्याने ती बदलून ५४ क्रमांकाची जर्सी घेतली आहे.
क्रिकेटचा आराध्यदैवत आणि भारताचा महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरने १० नंबरच्या जर्सीला एक वेगळेच महत्त्व दिले आहे. कदाचित यामुळेच सोशल मीडियावर जेव्हा सचिनच्या १० क्रमांकाची जर्सी शार्दुल ठाकूर वापरतो ही बातमी पसरली तेव्हा शार्दुलला खूप जास्त ट्रोल करण्यात आले होते.
शार्दुल ठाकुरने याबद्दल स्पष्टीकरण देताना असे सांगितले होते की अंकशास्त्रामुळे त्याने हा अंक निवडला होता. या मागे सचिन जो क्रमांक घालायचा तो क्रमांक त्याला घालायचा असे काही नव्हते.
श्रीलंका दौऱ्यानंतर शार्दुल ठाकूरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला सामील करण्यात आले आहे. पण पहिल्या सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळवता आले नाही.
पहिल्या सामन्याच्या आधी सरावा दरम्यान शार्दुल ठाकूरने ५४ क्रमांकाची जर्सी घातली होती.