भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी (७ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
इंडिया टुडेमधील वृत्तानुसार, हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरही गांगुलीने त्याच्या जबाबदाऱ्यांवर दुर्लक्ष केले नाही. बीसीसीआयचा अध्यक्ष असल्याने त्याने ५ जानेवारी रोजी झालेल्या आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या ऑनलाइन बैठकीत भाग घेतला होता. मात्र त्याची तब्येत ठीक नसल्याने तो व्हिडिओ कॉलवर उपलब्ध राहु शकला नाही. परंतु त्याने ऑडिओ कॉलद्वारे बैठकीत सहभाग नोंदवला होता. या बैठकीत आयपीएलच्या येत्या चौदाव्या हंगामासंदर्भात काही महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांविषयी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला माहिती दिली आहे. पटेल म्हणाले की, “२१ जानेवारीपर्यंत आयपीएलच्या सर्व संघांना खेळाडूंना कायम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर आयपीएलच्या सहभागी संघांसाठी असणारी ट्रेडिंग विंडो ४ फेब्रुवारीला बंद होईल. तसेच आयपीएलच्या पुढील हंगामातील खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.”
जिममध्ये व्यायाम करताना छातीत दुखण्याबद्दल केली होती तक्रार
शनिवारी (३ जानेवारी) सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता.
घरामधे लक्ष ठेवणार डॉक्टर
वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ रुपाली बासू काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की, “सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यानंतर, नियमितपणे त्यांच्या घरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया
सौरव गांगुलींना आलेल्या हार्ट अटॅकमुळे ‘या’ कंपनीने हटवल्या जाहिराती
अजून एक दिवस सौरव गांगुलीला डिस्चार्ज मिळणार नाही; काय आहे कारण, घ्या जाणून