पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपल्या संघाची आज घोषणा केली. या संघात डॅरेन डुपाविलन, ऑटनिल बार्टमैन या सारख्या नवख्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला दुखापतीमुळे मुकलेल्या कागिसो रबाडाचे या दौऱ्यासाठी पुनरागमन झाले आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा न केलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ या महिन्याच्या अखेरीस मात्र पाकिस्तानात कसोटी मालिका खेळणार आहे.
या संघातील नवख्या खेळाडूंपैकी डॅरेन डुपाविलनने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने आरोन फिंचला बाद केले होते. तसेच या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून त्याची सर्वोत्तम धावगती होती. तसेच दुसरा नवखा खेळाडू असलेल्या ऑटनिल बार्टमैनने आफ्रिकेच्या मागील प्रथम श्रेणी हंगामात डीन एल्गर, रीजा हेंड्रिकस आणि टेम्बा बावुमाला बाद केले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील शुक्रवारी पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. आफ्रिकेचा संघ सरावाला सुरुवात करण्यापूर्वी कराचीत विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करेल. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका पाकिस्तानशी दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेला २६ जानेवारी रोजी सुरुवात होईल, तर दुसरा सामना ८ फेब्रुवारीपासून खेळवण्यात येईल. या मालिकेनंतर टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेचा संघही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ
क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेम्बा बावुमा, एडेन मार्करम, फाफ डू प्लेसी, डीन एल्गर, कगिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रैसी वैन डर डुसेन, एनरिक नॉर्टजे, वियान मल्डर, लूथो सिपामला, ब्युरेन हेंड्रिक्स, काइल वेरेयने, सैरल एरवी, कीगन पीटरसेन, तबरेज़ शम्सी, जॉर्ज लिंडे, डैरिन डुपाविलन, ऑटनिल बार्टमैन
महत्वाच्या बातम्या:
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!
ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण