क्रिकेट जगतातील प्रमुख संघांपैकी एक असलेला श्रीलंका क्रिकेट संघ संक्रमणाच्या काळातून जात आहे. अनेक प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर श्रीलंका संघ खराब प्रदर्शन करत होता. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकात संघाने चांगली कामगिरी केली होती. त्याचवेळी आता श्रीलंका संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
त्या खेळाडूंचे हटविले निलंबन
मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर शिस्तभंग प्रकरणी निलंबनाची कारवाई झालेल्या धनुष्का गुणतिलिका, निरोशन डिकवेला व कुसल मेंडीस यांच्यावरील निलंबन मागे घेण्याची घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी हे तिघेही निवडीसाठी उपलब्ध असतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मीडिया मॅनेजर प्रसन्न रोड्रिगो यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले.
का झाली होती कारवाई
श्रीलंका क्रिकेट संघ मागील वर्षी मे महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या संपूर्ण दौऱ्यात खेळाडूंना बायो-बबलविषयी सक्त नियमावली लागू करण्यात आली होती. मात्र, हे तिन्ही खेळाडू रात्री ब्रिस्टल येथील रस्त्यांवर फिरताना आढळून आले होते. तसेच, या खेळाडूंचे धूम्रपान करतानाचे छायाचित्र देखील व्हायरल झालेले. हे प्रकरण समोर आल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना तातडीने संघाबाहेर करत मायदेशी बोलावून घेतले होते. तसेच, या प्रकरणाची चौकशी करत त्यांच्यावर एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी न होण्याचे निलंबन लावले गेलेले.
संघातील प्रमुख सदस्य आहेत हे खेळाडू
वरील तीनही खेळाडू श्रीलंका संघातील अनुभवी खेळाडू मानले जातात. विशेष म्हणजे या तिघांनीही संघाचे उपकर्णधारपद भूषविले आहे. त्यामुळे, ठराविक अवधीपेक्षा आधीच त्यांच्यावरील बंदी उठवली गेल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीलंका क्रिकेटमधील अनेक युवा क्रिकेटपटू निवृत्ती घेत असल्याने, या खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यात आल्याचे बोलले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-