पुणे । महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पाचव्या सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात औरंगाबादच्या प्रदीप मोर यांनी उत्कृष्ट खेळ करत पिंपरी चिंचवडच्या अनिस पालचा पराभव केला.
पहिल्याच राऊंडपासून प्रदीपने जोरदार हल्ला चढवत अनिस पाल याला सावरण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे त्याचा 10-9 असा पराभव झाला.
राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या योगा हॉलमध्ये पाचव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेची आजपासून सुरुवात झाली. राज्यातील 26 जिल्ह्यातील आणि शहरातील बॉक्सिंग संघटनेचे 200 पेक्षा अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी एकूण 26 बाऊट झाले. यात पहिला सामना मुंबई उपनगरचा खेळाडू पवन यादव आणि नाशिक जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खेळाडू सुमीत सिनकर यांच्या झाला.
मात्र पंचाने खेळ थांबवण्याची घोषणा केल्याने मुबंई उपनगरचा खेळाडू पवन यादव विजयी ठरला. दुसऱ्या सामन्यात जळगाव शहराचा खेळाडू मिलिंद चौधरी खेळू न शकल्यामुळे अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खेळाडू प्रणव देशमुखला विजयी घोषित करण्यात आले.
तिसरा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. औरंगाबादच्या प्रदीप मोर यांनी उत्कृष्ट खेळ करत पिंपरी चिंचवडच्या अनिस पाल याचा 10-9 असा पराभव केला. चौथ्या बाऊटमध्ये साताऱ्याचा रोहित चोरसिया आणि नागपूर शहराचा मुष्टीयुद्धा आर्यन दाभाडे यांच्या सामना झाला. यात रोहितने आर्यनचा 10-9 असा पराभव केला.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भारतकुमार वाव्हळ म्हणाले की, महाराष्ट्रात बॉक्सिंगच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरविल्या तर उच्च कोटीचे खेळाडू तयार होतील.
त्यांना सर्व सुविधा दिल्यास भविष्यात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक नक्कीच जिंकतील. लवकरच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राजबाग, लोणी काळभोर येथील संकुलात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा भरविण्याचा आमचा मानस आहे.
त्यासाठी एमआयटीने मदत करावी. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू घडतील, असेही त्यांनी सांगितले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड म्हणाले की, एमआयटी ग्रुप तर्फे नेहमीच खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. आगामी काळात सर्वच प्रकारच्या खेळासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल.
राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेमुळे भविष्यात राज्यातून अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुष्टीयोद्धा महंमद अली सारखे खेळाडू तयार होतील. देशाच्या प्रत्येक कुटुंबाने खेळाला आणि आपल्या मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याची गरज आहे.
सर्वांनी उड्डाण भरण्याची ताकद खेळाडूंना दिली की जागतिक कीर्तीचे खेळाडू तयार होतील, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी कदमवाक वस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच गौरी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे,सपोर्ट डायरेक्टर पद्माकर फड गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अमोल काळभोर, भाजपचे चितरंजन गायकवाड, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष एकनाथ चव्हाण, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. जी. अगवाने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, स्पर्धेचे व्यवस्थापक अभिमान सुर्यवंशी, ॲड. संपत साळुंखे, राजन जोथाडी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजन जोथाडी यांनी तर सूत्रसंचालन ऋषीकांत वचपल यांनी केले.