दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा कसोटी फॉर्म गेल्या काही काळापासून चांगला नव्हता. त्यानं जवळपास दोन डझन डावांमध्ये एकही शतक झळकावलं नव्हतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटीतही स्मिथची बॅट शांतच होती. मात्र ब्रिस्बेनच्या गाबामध्ये दमदार शतक झळकावून त्यानं फॉर्ममध्ये वापसी केली आहे. ट्रॅव्हिस हेड आधीच फॉर्मात असून या मालिकेत त्यानं सलग दुसरं शतक झळकावलं. आता स्मिथ देखील फॉर्ममध्ये आल्यानं भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
उजव्या हाताचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं कसोटी क्रिकेटमधील 33 वं शतक ठोकलं. 32व्या शतकावरून 33व्या शतकापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 26 डाव आणि सुमारे दीड वर्ष वाट पाहावी लागली. त्यानं जून 2023 मध्ये कसोटी क्रिकेटमधील शेवटचं शतक झळकावलं होतं. हे शतक जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आलं होतं. त्यावेळीही त्याच्यासमोर भारतीय संघच होता.
शतक झळकावल्यानंतर स्मिथ जास्त काळ क्रीजवर थांबू शकला नाही. तो 190 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत कर्णधार रोहित शर्मानं त्याचा झेल घेतला. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील स्मिथचं हे 10 वं शतक आहे. यासह त्यानं भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत जो रूटची बरोबरी केली. या दोघांनी भारताविरुद्ध प्रत्येकी 10 शतकं झळकावली आहेत. मात्र, स्मिथनं ही कामगिरी 41 डावांत केली, तर रुटला यासाठी 55 डाव लागले. या दोघांशिवाय गॅरी सोबर्स, व्हिव्ह रिचर्ड्स आणि रिकी पाँटिंग यांनी भारताविरुद्ध 8-8 कसोटी शतके झळकावली आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके
स्टीव्ह स्मिथ – 10 (41 डाव)
जो रूट – 10 (55 डाव)
गॅरी सोबर्स – 8 (30 डाव)
व्हिव्ह रिचर्ड्स – 8 (41 डाव)
रिकी पाँटिंग – 8 (51 डाव)
याशिवाय स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानं स्टीव्ह वॉला मागे टाकलं, ज्याची 32 शतकं आहे. सध्या स्मिथपुढे फक्त रिकी पाँटिंग आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 41 शतकं ठोकली आहेत.
हेही वाचा –
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडचं सलग दुसरं शतक, भारतीय गोलंदाज हतबल, टीम इंडिया बॅकफूटवर
रिषभ पंतचा गाबा कसोटीत ऐतिहासिक विक्रम, अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक
ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडीत, किवी कर्णधाराने रचला इतिहास