ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतीची चिंता सतावत आहे. भारताने अनेक खेळाडू या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाले आहेत. आता नुकतेच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे दोन खेळाडू शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) दुखापतग्रस्त झाले आहेत.
या दोघांनाही स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यामुळे शनिवारी शेवटच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान या दोघांऐवजी दोन राखीव क्षेत्ररक्षक भारताला मैदानात उतरवावे लागले. पंत यष्टीरक्षक असल्याने त्याच्याऐवजी वृद्धिमान साहा बदली यष्टीरक्षक म्हणून आला तर मयंक अगरवालने जडेजा ऐवजी क्षेत्ररक्षण केले.
पण नेहमी एखादा मैदानातील क्षेत्ररक्षक बाहेर जातो, तेव्हा दुसरा राखीव खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आलेला पाहायला मिळतो. मात्र यष्टीरक्षकाबाबत, असे घडताना फारसे दिसून येत नाही. त्यामुळे अनेकांना राखीव यष्टीरक्षकाचा काय नियम आहे, हा प्रश्न पडला आहे. याबाबत थोडेसे जाणून घेऊया.
नक्की काय आहे राखीव यष्टीरक्षकाचा नियम?
सन १९८० ते २०१७ दरम्यान राखीव क्षेत्ररक्षकाला फलंदाजी, गोलंदाजी, नेतृत्व किंवा यष्टीरक्षण करण्याची परवानगी नव्हती. मात्र साल २०१७ ला हा नियम बदलण्यात आला आणि राखीव क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षण करण्याची परवानगी देण्यात आली.
याबाबत मेरीलबन क्रिकेट क्लब (एमसीसी) चा नियम असे सांगतो की ‘जर अंतिम ११ जणांच्या संघात असलेला यष्टीरक्षक खरंच दुखापतग्रस्त असेल, तर राखीव क्षेत्ररक्षक यष्टीरक्षण करु शकतो. पण यासाठी पंचांची परवानगी आवश्यक आहे. तसेच जरी राखीव क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षण करण्याची परवानगी देण्यात आली, तरी राखीव क्षेत्ररक्षक फलंदाजी, गोलंदाजी किंवा नेतृत्व करु शकत नाही.’
दरम्यान अनेकांना असाही प्रश्न पडू शकतो की ‘कन्कशन सबस्टिट्यूट’मध्ये बदली खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी कसा करु शकतो. तर त्याचे कारण असे की २०१९ ला एक नवीन नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार जर कोणताही खेळाडू डोक्याला किंवा मानेच्या जवळ सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने जखमी झाल्यास बदली खेळाडू संघात सामील होऊ शकतो. तो खेळाडू १२ वा खेळाडूही असू शकतो.
पण असे असले तरी ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त होईल तशाच प्रकारचा बदली खेळाडू असायला पाहिजे. म्हणजेच जर गोलंदाज जखमी झाला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडूही गोलंदाजच असायला हवा. तसेच या बदलासाठी सामनाधिकाऱ्यांची मंजूरी असणे, गरजेचे आहे. याबरोबरच हा नियम जर एखाद्या खेळाडूला कोविड-१९ ची लक्षणे आढळली तरी लागू होऊ शकतो.
त्यामुळे पंतला डोक्याला दुखापत झाली नसल्याने भारताला कन्कशन सबस्टिट्यूट वापरता येणार नाही, मात्र वृद्धिमान साहा राखीव यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. असे असले तरी साहाला पंत ऐवजी फलंदाजी करण्याची परवानगी नाही.
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
राखीव यष्टीरक्षकाचा भारतच पहिला लाभार्थी –
साल २०१७ ला जेव्हा राखीव क्षेत्ररक्षक हा राखीव यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो, हा नियम लागू झाला, त्यानंतर त्या नियमाचा पहिला वापर भारतानेच केला होता. साल २०१८ ला जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पार्थिव पटेल ऐवजी दिनेश कार्तिकने राखीव यष्टीरक्षक म्हणून यष्टीरक्षण केले होते. त्यामुळे कार्तिक हा पहिला राखीव यष्टीरक्षक ठरला होता.
तसेच काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या एका कसोटी सामन्यात शेन डावरिच ऐवजी जोशुओ दा सिल्वाने राखीव यष्टीरक्षक म्हणून यष्टीरक्षण केले होते.
सध्या भारतीय गोटात चिंतेचे वातावरण –
भारतीय संघाला सध्या सातत्याने खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींची चिंता सतावत आहे. चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारताचे ३ खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मालिकेतून बाहेर पडले आहेत. या ३ खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे हे तिघेही भारतात परतले आहेत. आता जडेजा आणि पंत देखील दुखापतग्रस्त आहे. अजून त्यांची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.
त्याचबरोबर या दौऱ्याआधीच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे दोन वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त होते. त्यामुळे त्यांचा या दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. तसेच रोहित शर्मा देखील या दौऱ्यातील वनडे, टी२० आणि कसोटी मालिकेतील पहिले २ सामने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
ग्रेग चॅपेल यांनी निवडलेल्या कसोटी संघात कोहलीला मिळाले स्थान; ‘या’ भारतीय फलंदाजाचाही समावेश
भारतीय संघाला सिडनी कसोटीच्या तिसर्या दिवशी भोवल्या ‘या’ तीन चुका