कोलंबो। श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाने एक खास विक्रम केला आहे.
रैनाने आज २७ चेंडूत २८ धावा करताना १ षटकार आणि १ चौकार मारला. या षटकाराबरोबरच रैनाने आंतराष्ट्रीय टी२० मध्ये ५० षटकार मारण्याचा टप्पा पार केला आहे. असे करणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी हा विक्रम भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनी केला आहे. तसेच रैना आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. या यादीत युवराज अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.
रैनाने नुकतेच एकवर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने आजपर्यंत ७० आंतराष्ट्रीय टी २० सामन्यात २९.०८ च्या सरासरीने १४२५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
आज कोलंबोत पार पडलेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशविरुद्ध ६ विकेटने विजय मिळवला आहे.
भारताकडून आंतराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
युवराज सिंग – ७४ षटकार
रोहित शर्मा – ६९ षटकार
सुरेश रैना – ५० षटकार
एम एस धोनी – ४६ षटकार
विराट कोहली – ४१ षटकार