एक वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने दिग्गज बॉलिवूड गायक किशोर कुमारांचे एक गाणे गाऊन संघा सहकाऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्याने हे गाणे श्रीलंकेत पार पडलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेदरम्यान गायले असून त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे.
VIDEO: You've seen him on the field, but ever seen him SING a Kishore Kumar classic? Presenting – @ImRaina the SINGER #TeamIndiahttps://t.co/yhvRwmbnDd pic.twitter.com/llB03VW4fH
— BCCI (@BCCI) March 11, 2018
या व्हिडीओमध्ये सुरेश रैनाने किशोर कुमारांचे ‘ये शाम मस्तानी… मदहोश किए जाए’ हे गाणे गायले आहे. यात त्याला गिटारवादक आणि कॉन्गा ड्रम वादक यांनीही साथ दिली. रैनाचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र खूप वायरल होत आहे.
रैनाची गायनाची कला त्याच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. रैनाचे गाण्याबद्दलचे प्रेम क्रिकेट चाहत्यांना माहित आहे. त्याने याआधीही ‘मेरठियां गँगस्टर’ या बॉलीवूड चित्रपटाच्या ‘तू मिली सब मिला’ या गाण्यासाठी आवाज दिला आहे.
रैना सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने मागील महिन्यात पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध आणि नुकत्याच संपलेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती.
तसेच रैना पुढील महिन्यात चालू होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या मोसमात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. मागील दोन आयपीएल मोसमात त्याने गुजरात लायन्स संघाचे नेतृत्व केले होते.