भारतभर आज (१ ऑगस्ट) ‘फ्रेंडशीप डे’ अर्थातच ‘मैत्री दिवस’ साजरा केला जात आहे. या दिनी मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करत असतात. भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यानेही या दिनाचे औचित्य साधून आपली जवळची मैत्रिण आणि पत्नी देविशा शेट्टी हिला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्नीच आहे सूर्यकुमारची बेस्ट फ्रेंड
सूर्यकुमारने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर देविशा आणि आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘माझ्या सर्वात जवळच्या (बेस्ट फ्रेंड) मैत्रिणीला मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा. तू नेहमी माझ्या चांगल्या-वाईट दिवसांत माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली आहेस.’
मुंबईच्या कॉलेजमध्ये झाली होती पहिली भेट
सूर्यकुमार वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा देविशाला भेटला होता. २०१२ मध्ये मुंबईच्या पोतदार डिग्री महाविद्यालयात सूर्यकुमार बी कॉमचा विद्यार्थी होता. त्यावेळी देविशाने १२ वी पास झाल्यानंतर प्रथमच या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. इथेच त्यांची एकमेकांशी पहिली भेट झाली आणि इथूनच त्यांचे प्रेमाचे तारही जुळले.
२०१६ मध्ये बांधली लग्नगाठ
सूर्यकुमार आणि देविशाच्या महाविद्यालयातील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि पुढे त्यांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे ठरवले. २०१६ मध्ये दक्षिण भारताच्या रिती रिवाजांनुसार त्यांनी लग्न केले होते. देविशा दक्षिणात्य भागातील राहणारी असल्याने त्यांनी या पद्धतीने विवाह केला होता.
https://www.instagram.com/p/CSBRH9UrWB7/?utm_source=ig_web_button_share_sheet
श्रीलंका दौरा गाजवल्यानंतर सूर्यकुमार कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत
सूर्यकुमारने नुकतेच श्रीलंकाविरुद्ध प्रभावी प्रदर्शन केले आहे. त्याने श्रीलंकाविरुद्ध कोलंबो येथे वनडे पदार्पण केले आहे. या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ६२ च्या सरासरीने १२४ धावा करत तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. अशाप्रकारे पदार्पणाच्या वनडे मालिकेत मालिकावीर पुरस्कार जिंकण्याची किमया त्याने साधली आहे. भारताने २-१ च्या फरकाने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली होती.
पुढे पहिल्या टी२० सामन्यानंतर अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कात आल्याने इतर सहकाऱ्यांसह सूर्यकुमारलाही उर्वरित टी२० मालिकेला मुकावे लागले होते. भारताने २-१ ने ही टी२० मालिका गमावल्यानंतर कृणालसह कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम श्रीलंकेतच थांबले आहेत. उरलेले भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत.
तर सूर्यकुमार पृथ्वी शॉसह श्रीलंकेतच थांबला आहे. ते दोघेही आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा भाग आहेत. लवकरच ते कोलंबोहून इंग्लंडला उड्डाण भरतील. इंग्लंड दौऱ्यातून सूर्यकुमारला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पराभवानंतर खूप व्हायरल झाले होते ‘त्या’ चाहत्याचे मीम, आता म्यूझीयममध्ये मिळाली जागा