जयदत्त क्रीडा मंडळाने आपल्या “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित केलेल्या “स्वप्नसाफल्य चषक” कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यातून एस एस जी फाउंडेशन,श्रीराम संघ, सिद्धीप्रभा फाऊंडेशन,जय दत्तगुरु मंडळ, जागर स्पोर्ट्स, दुर्गामाता स्पोर्ट्स यांनी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्र्चित केला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व मुंबई शहर कबड्डी असो. यांच्या मान्यतेने व जय दत्त क्रीडा मंडळ आयोजित प्रभादेवी येथील स्व.राजाराम साळवी उद्यानातील “स्व.किरण बाळू शेलार” क्रीडांगणावर झालेल्या ब गटातील सामन्यात मुंबईच्या एस एस जी फाउंडेशनने उपनगरच्या पार्ले स्पोर्ट्सला ३७-१९ असे नमवित या गटात अग्रक्रम पटकाविला. या पराभवामुळे पार्ले स्पोर्टसला साखळीतच गारद व्हावे लागले.
एस एस जी ने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत मध्यांतराला २१-०५अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्र्चित केला. उत्तरार्धात सावध खेळ करीत त्यावर शिक्कामोर्तब केले. सर्वेश चाचे, ओमकार थोटे या विजयात चमकले. पार्ल्याचा अलिफ खैर एकाकी लढला.
क गटातील श्रीराम संघ विरुद्ध सिद्धीप्रभा हा सामना अत्यंत चुरशीनें खेळला गेला. त्यात श्रीराम संघाने २८-२३ अशी बाजी मारली. प्रतीक जाधव, प्रशांत खेडेकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत श्रीरामला विश्रांतीला १६-०९अशी आघाडी मिळवून दिली होती.
विश्रांतीनंतरच्या खेळात सिद्धीप्रभाच्या ओमकार ढवळे, मिलिंद पवार यांना सूर सापडला,पण तो पर्यंत वेळ निधून गेली होती. सिद्दीप्रभाचा या सामन्यात पराभव जरी झाला असला तरी त्याने साखळीतील पहिल्या विजयामुळे बाद फेरीत प्रवेश केला.
ड गटात जागर स्पोर्ट्सने मध्यांतरातील ०७-२३ अशा १६ गुणांच्या पिछाडीवरून जय दत्तगुरु मंडळाला ३०-३०असे बरोबरीत रोखले. पण गुणांच्या सरासरीवर या गटातून जय दत्तगुरु प्रथम, तर जागर स्पोर्ट्स द्वितीय क्रमांक मिळवीत बाद फेरीत दाखल झाले.जागरचा कल्पेश मांडवकर, तर जय दत्त गुरूचा सिद्धांत बोरकर चमकला. अ गटात ठाण्याचा शिवशंकर क्रीडा मंडळ हा संघ गैरहजर राहिल्यामुळे मुंबईच्या दुर्गामाता स्पोर्ट्स संघाला विजयी घोषित करण्यात आले.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने (९ मार्च २०१९)
१) दुर्गामाता स्पो क्लब विरुद्ध जागर स्पो क्लब
२) विकास क्रीडा मंडळ विरुद्ध श्री राम
३) सिद्धी प्रभा फाउंडेशन विरुद्ध एस. एस. जी. फाउंडेशन
४) जय दत्तगुरु कबड्डी संघ विरुद्ध सह्याद्री क्रीडा मंडळ