सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार रंगला आहे. दरम्यान सुपर १२ मधील संघांंमध्ये सराव सामने खेळवले जात आहेत. यातील एक सराव सामना बुधवारी (२० ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झाला. टॉलरन्स ओव्हलच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९.२ षटकातच १५० धावांवर सर्वबाद झाल्याने इंग्लंडने १३ धावांनी हा सामना खिशात घातला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली होती. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या इंग्लंडला पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयच्या रुपात पहिला धक्का बसला होता. परंतु पुढे दुसरा सलामीवीर जोस बटलरने संघाचा मोर्चा सांभाळला. त्याने ५१ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ७३ धावा चोपल्या. चौदाव्या षटकात ईश सोधीने कायल जेमिसनच्या हातून त्याच्या मॅरेथॉन खेळीवर अंकुश लावला.
बटलरव्यतिरिक्त जॉनी बेयरस्टोने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली. तसेच सॅम बिलिंगनेही अंतिम षटकांमध्ये झटपट नाबाद २७ धावा जोडल्या. परिणामी इंग्लंडचा संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १६३ धावा फलकावर लावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून ईश सोधीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन आणि टीम साउथी यांनी प्रत्येकी १ विकेटचे योगदान दिले होते.
इंग्लंडच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने ४१ धावांची आक्रमक खेळी केली होती. २० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या होत्या. सातव्या षटकात आदिल राशिद त्याची महत्त्वपूर्ण विकेट काढली आणि सामना इंग्लंडच्या बाजूने वळला. गप्टिलव्यतिरिक्त फक्त ईश सोधीने नाबाद २५ धावा केल्या. परंतु इतर फलंदाज २० धावांचा आकडाही ओलांडू शकले नाहीत.
इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच आदिल राशिदने ३ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. लियाम लिविंगस्टोन आणि ख्रिस वोक्स यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणपदी ‘या’ दिग्गज कोचची लागू शकते वर्णी, द्रविडसोबत केलंय काम
दुखापत नडली; टी२० विश्वचषक संघातील हार्दिकची जागा धोक्यात, रोहित शर्माकडून मिळाले संकेत
नामिबियाच्या सांघिक कामगिरीपुढे नेदरलँडची ६ विकेट्सने हारकिरी, टी२० विश्वचषकातून कटला पत्ता!