पुणे। पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने नव्या मोसमाची सुरवात करंडकाने केली. थायलंडमधील टीडब्ल्यूसी क्रॉस कंट्री रॅलीत त्याने टी1 गटात चौथे, तर एकूण क्रमवारीत सहावे स्थान मिळविले.
कांचनाबुरी प्रांतात ही रॅली पार पडली. प्रामुख्याने सरावाच्या उद्देशाने त्याने भाग घेतला होता. डेलो स्पोर्ट टीमने सुसज्ज केलेली नवी इसुझू युटीलीटी कार त्याने चालविली. इत्तीपोन सिमाराक्स हा त्याचा नॅव्हीगेटर होता. टी1 हा ग व्यावसायिक स्पर्धकांचा होता. त्यात मुक्तपणे तसेच मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बदल करण्यात आलेल्या कार होत्या. त्यामुळे पहिल्या पाच स्पर्धकांना करंडक देण्यात आले,
शुक्रवारी सर्व्हिस पार्कमधील कारचे सामान नडगीला लागून रक्त आल्याने संजयसाठी प्रारंभ नकारात्मक ठरला होता. त्यातच शनिवारी आणि रविवारी मार्ग चुकून भरकरटण्याचाही फटका बसला. याशिवाय सस्पेन्शन तुटले. यानंतरही संजयने रॅली पूर्ण केली
पहिल्या दिवशी संजयने पहिली स्पेशल स्टेज 2 मिनिटे 40 सेकंद पेनल्टीसह पुर्ण केली. त्यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर होता. आघाडीवरील एल. सुवात याच्यापेक्षा तो केवळ दोन सेकंदांनी मागे होता. त्यावेळी त्याला चांगली संधी होती. सर्व्हिस झाल्यानंतर जंगलातील मार्गातून दिर्घ स्टेज होती. याठिकाणी थायलंडचे लष्कर युद्धाचा सराव करते. स्टेज सुरु होणार असतानाच मुसळधार पासाला सुरवात झाली. पहिले दहा किलोमीटर संजयचा वेग चांगला होता. त्यानंतर वेग वाढविण्याच्या प्रयत्नात असतानाच पाऊसही वाढला. जंगलातील मार्ग वळणा-वळणांचा होता. त्यातच 30 किलोमीटरच्या टप्यास इत्तीपोन डावीकडचे एक छोटे वळण चुकला. त्यामुळे सुमारे दहा मिनिटे वाया गेली. रॅलीच्या मार्गाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेनुसार पुढचे वळण जुळले नाही. त्यामुळे ते मागे फिरले. पावसामुळे आधीच्या मार्गावरील टायरच्या खुणाही दिसत नव्हत्या. वेळ भरून काढण्यासाठी संजयने कार जोरात चालविली, पण एका खड्यापाशी कार सुमारे 70 अंशापर्यंत उचलली गेली. त्यात स्टीअरिंग निसटले, पण संजयने ते कसेबसे परत बसविले. अखेर मार्ग मिळाल्यानंतर त्याने रॅली पुढे सुरु केली. ती स्टेज त्याे पूर्ण केली.
दुसऱ्या दिवशी सस्पेन्शन सहा किलोमीटरनंतर तुटले. त्यातच मार्गही चुकला. पाच मिनिटे वाया गेल्यानंतर पुन्हा मार्ग मिळाला. सस्पेन्शन बसविल्यानंतर संजयने ही स्टेज पूर्ण केली. दोन दिवसांमधील विलंबामुळे त्याची आणखी वरचा क्रमांक मिळविण्याची संधी हुकली.
संजयने सांगितले की, माझा वेग आणि ड्रायव्हिंग आक्रमक असल्यामुळे नव्या नॅव्हीगेटरला जुळवून घेण्यास वेळ लागला. नॅव्हीगेटरची निवड संघ करते. एकूण कामगिरी रॅली पूर्ण केल्यामुळे समाधानकारक ठरली. सरावाचा मुख्य उद्देश साध्य झाला.