संयुक्त अरब अमीरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा स्कॉटलंडशी सामना झाला. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचवेळी शुक्रवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा ३३ वा वाढदिवस होता. भारतीय संघाचा विजय व विराटचा वाढदिवस अशा दुहेरी आनंदाच्या क्षणांच्या पार्श्वभूमीवर केक कापून हा आनंद द्विगुणित करण्यात आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
साजरा केला विराट वाढदिवस
भारतीय संघाच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. त्यातच विराटच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय संघातील खेळाडूंनी व सपोर्ट स्टाफने केक कापून हा क्षण साजरा केला. भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याने केक कापण्याची पूर्व तयारी केली. त्यानंतर बर्थडे बॉय विराटचे आगमन झाले. विराटने मेणबत्त्या फुंकत केक कापला.
https://www.instagram.com/p/CV6DnPTjNXI/
केक कापल्यानंतर त्याने पहिला घास धोनीला भरवीला. त्यापाठोपाठ शार्दुल ठाकुर, ईशान किशन सुर्यकुमार यादव व अन्य खेळाडूंनी विराटला केक भरवत शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला ‘केक, हास्य आणि विजय’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. रात्री उशिरा अपलोड केलेल्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती लाभत आहे.
विराटची राहिली आहे दैदिप्यमान कारकीर्द
शुक्रवारी ३४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या विराटची आत्तापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दैदिप्यमान राहिली आहे. २००८ मध्ये त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारतीय संघाचा खेळाडू व सध्या कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत तो आपले योगदान देताना दिसत आहे. तो कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत व २०११९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सध्या सुरू असलेला टी२० विश्वचषक त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल. त्याने यापुढे आपण टी२० संघाचा कर्णधार राहणार नाही असे जाहीर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर
भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा
‘बर्थडे बॉय’ विराट स्कॉटलंडविरुद्ध मैदानात पाय टाकताच ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार