अखेर आज (५ फेब्रुवारी) तो दिवस उजाडला आहे. आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु पहिल्या कसोटी सामन्याची प्लेइंग इलेव्हन अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्वांना या सामन्यातील ‘विराटसेना’ कशी असेल?, याची उत्सुकता लागली आहे.
चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी सोईस्कर असल्याचे दिसून आले आहे. त्या अनुशंगाने भारतीय संघ ३ फिरकीपटूंसह मैदानावर उतरण्याची जास्त शक्यता आहे. अशात दुखापतीमुळे गोलंदाजी न करू शकणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या याला बाकावर बसावे लागू शकते. कारण दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकणार नाही आणि केवळ फलंदाज म्हणून त्याला स्थान देणे अवघड जाईल.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या माहितीनुसार संघाची सलामी जोडी ठरली आहे. त्यामुळे चेन्नई कसोटीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करताना दिसतील. याबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. आघाडीचे पाचही फलंदाज बाद झाल्यानंतर पंत दमदार कामगिरी करत संघाला चांगला शेवट करून देण्याची क्षमता राखतो. त्यानुसार पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जाऊ शकते.
तिसऱ्या क्रमांकावर ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा फलंदाजी करेल. तर कर्णधार विराट आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची जोडी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. फिरकी गोलंदाजी विभागात आर अश्विन आणि कुलदीप यांना संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. त्यांच्याबरोबर युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. शिवाय अक्षर पटेलाही टेस्ट कॅप मिळण्याची दाट शक्यता आहे.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमालीचे प्रदर्शन करणाऱ्या मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात येऊ शकते.
अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
“डॉक्टरांनी आत बोलावले तेव्हा मी फोनवर शार्दुल आणि सुंदरची भागीदारी पाहात होतो”, विराटने केला खुलासा
…म्हणून इंग्लंडपेक्षा भारतावरच असेल जास्त दबाव, कसोटी मालिकेआधी जो रुटची मोठी प्रतिक्रिया
INDvENG : पहिल्या सामन्यासाठी ठरले भारतीय सलामीवीर, तर यष्टिरक्षक म्हणून मिळाली ‘या’ खेळाडूला संधी