क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हॅट्रिक घेणे ही गोलंदाजीची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. म्हणून, सलग तीन चेंडूत तीन बळी घेणे हे एका गोलंदाजांचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम बर्याच वेळा केलेला आहे. भारताचे चेतन शर्मा हे विश्वचषकामध्ये हॅट्रिक घेणारे पहिले खेळाडू ठरले. या माजी खेळाडूने १९८७ मध्ये नागपूर स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकातील सामन्यादरम्यान अविश्वसनीय कामगिरी केली. न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद करून क्रिकेट इतिहासात हॅट्रिक करणारे ते पहिले गोलंदाज ठरले.
दुसरीकडे यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याच्या नावावर सर्वाधिक हॅट्रिकचा विक्रम आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५ वेळा हॅट्रिक घेतली आहे, ज्यात तीन वनडे आणि दोन टी२० क्रिकेटमध्ये घेतले आहेत.
आयपीएलमध्येही अनेक खेळाडूंनी हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात आली आहे, परंतु कोणत्या संघांने आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेतली आहे, हे फारच कमी लोकांना माहिती असेल. या लेखात जाणून घेऊ कोणत्या संघाने घेतली आहे सर्वाधिक हॅट्रिक.
५. चेन्नई सुपर किंग्ज – २ वेळा
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिल्या हॅट्रिकचा विक्रम एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नावावर आहे. आयपीएल (२००८) च्या पहिल्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध १० मे २००८ रोजी लक्ष्मीपती बालाजीने चेन्नईकडून प्रथम हॅट्रिक घेतली. त्याने त्याच्या सर्वोत्तम स्पेलमध्ये ४ षटकांत २४ धाव देत ५ विकेट्स घेतले, त्यात या हॅट्रिकचा समावेश होता. ८ दिवसानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज मखाया एनटिनीने केकेआरविरुद्ध दुसरी हॅट्रिक केली. अशा रीतीने या २ हॅट्रिक चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहेत.
४. डेक्कन चार्जर्स – २ वेळा
आयपीएलच्या दुसर्या सत्राचा विजेता डेक्कन चार्जर्सचा संघ होता, ज्यात रोहित शर्माने आपली गोलंदाजी दाखविली होती. सध्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेला हिटमन म्हणजेच रोहित शर्माने ६ मे २००९ रोजी डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरूद्ध खेळलेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती. यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा विक्रम असलेल्या अमित मिश्राने २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध संघासाठी दुसरी हॅट्रिक घेतली.
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २ वेळा
स्टार खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या दोन खेळाडूंनी हॅट्रिक केली आहे. प्रथम भारताचा माजी स्विंग गोलंदाज प्रवीण कुमारने २०१० मध्ये आरसीबीसाठी हॅट्रिक करण्याचा विक्रम केला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्ध १८ मार्च २०१० रोजी झालेल्या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील आपली पहिली आणि एकमेव हॅट्रिक घेतली. यानंतर ७ वर्षांनंतर म्हणजे १४ एप्रिल २०१७ रोजी सॅम्युअल बद्रीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध हॅट्रिक घेत, हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आपले नाव नोंदवले.
२. किंग्ज इलेव्हन पंजाब – ४ वेळ
किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक ४ हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला आहे. २००९ मध्ये सिक्सर किंग युवराज सिंगने दोनदा हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला. त्याने १ मे रोजी बेंगलोर आणि १९ मे रोजी डेक्कन चार्जर्सविरूद्ध हॅट्रिक घेत इतिहास रचला. योगायोग असा की दोन्ही हॅट्रिक दरम्यान युवीने एकूण ३ बळी घेतले, तर त्याचा इकॉनॉमी रेट हा ८ होता.
पंजाबच्या खात्यात पुढील हॅट्रिक २०१६ मध्ये आली, जेव्हा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकसह एकूण ४ गडी बाद केले. सन २०१९ मध्ये पंजाबने सॅम करणचा आपल्या संघात समावेश केला होता. या हंगामात करणने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध २.२ षटकांत ११ धावा देत शानदार गोलंदाजी केली आणि हॅट्रिकसह ४ बळी घेतले.
१. राजस्थान रॉयल्स – ४ वेळ
आयपीएलचा पहिला हंगाम जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघानेही ४ हॅट्रिक आपल्या नावे केली आहेत. संघासाठी पहिली हॅट्रिक अजित चंडीलाने पुणे वॉरियर्स इंडियाविरूद्ध १३ मे २०१२ रोजी घेतली होती. त्याने हॅट्रिकसह एकूण ४ बळी घेतले आणि ४ षटकांच्या गोलंदाजीत केवळ १३ धावा दिल्या.
यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये राजस्थानच्या खात्यात दोन हॅट्रिक झाल्या. प्रवीण तांबेने ५ मे रोजी केकेआरविरुद्ध हॅट्रिक घेतली, तर शेन वॉटसनने ८ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हॅट्रिक घेतली. नंतर श्रेयस गोपाळ याने पाच वर्षानंतर हॅट्रिक घेतली. ३० एप्रिल २०१९ रोजी त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध फक्त एक षटक टाकले आणि जादुई फिरकीच्या जोरावर सलग तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रास्ता दाखविला.