पुणे । पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले भरगच्च मोसमात थायलंडमधील रॅली मालिकेच्या नव्या मोसमातील पहिल्या फेरीसाठी सज्ज झाला आहे. थायलंड प्री-रॅली असे या मालिकेस संबोधले जाते.
थायलंड-कंबोडिया सीमेपासून जवळ असलेल्या नाखॉन प्रांतात ही रॅली होत आहे. शनिवारी सकाळी रेकी आणि सायंकाळी रॅलीचा प्रारंभ, सुपर स्पेशल स्टेज आणि रविवारी स्पेशल स्टेजेस होतील. थायलंडमध्ये दाखल झालेला संजय या रॅलीत यशाच्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहे.
यंदाच्या मोसमाचा प्रारंभ त्याने थायलंडमध्ये याच रॅलीने केला होता. फेब्रवारीत ही फेरी पार पडली. गेल्या वर्षाच्या मालिकेतील ती अखेरची फेरी होती. आता संजय नव्या मालिकेतील सलामीच्या फेरीत भाग घेईल. इसुझू कारटेक डेलो संघाने सुसज्ज केलेली इसुझु डी-मॅक्स कार संजय चालवेल.
थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर असेल. गेल्या वर्षाच्या अखेरीस संजने कंबोडियातील पहिल्यावहिल्या खमेर रॅली रेडमध्ये उपविजेतेपद मिळविले होते.
आशिया क्रॉस कंट्री रॅलीत पाच वेळा विजेतेपद मिळविलेल्या नाथ्थाफोन आंग्रीथानोनन याने ही रॅली जिंकली होती. त्यानंतर त्याने यंदाच्या मोसमाचा प्रारंभ करताना गिअर बिघडूनही रॅली पूर्ण करताना एकूण क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळविला होता.
अलिकडेच झालेल्या या दोन रॅलींमधील कामगिरीमुळे संजयचा आत्मविश्वास उंचावला आहे. याशिवाय त्याने लॅट्विया आणि इस्टोनिया येथील आव्हानात्मक रॅली यशस्वीरित्या पूर्ण केल्या. संजयने जागतिक रॅली मालिकेच्या (डब्ल्यूआरसी) जोडीला डकार रॅलीचेही लक्ष्य ठेवले आहे. याविषयी संजय म्हणाला की, थायलंडमध्ये युटिलीटी कार चालविणे डकारच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक आहे.
मोसमाच्या प्रारंभी हायड्रॉलीक क्लच पंप बिघडल्यानंतरही संजयने तीन स्टेज एकाच गिअरमध्ये चालवित रॅली पूर्ण केली. 38 किलोमीटर अंतर त्याने केवळ दुसऱ्या गिअरवर चावविले, पण त्याने रॅली पूर्ण केल्यामुळे थान्याफातला नॅव्हीगेटरच्या राष्ट्रीय क्रमवारीत यश मिळाले.
मागील वर्षी संजयला कारच्या तांत्रिक बिघाडामुळे दोन फेऱ्या पूर्ण करता आल्या नव्हत्या, पण खमेर रॅली रेड आणि मोसमाच्या प्रारंभी दोन रॅली त्याच्यासाठी उत्कंठावर्धक ठरल्या.
संजयने सांगितले की, विचाई वात्ताहाविशुथ हे संघाचे तांत्रिक प्रमुख आहेत. ते व त्यांचे सहकारी मला सुसज्ज कार मिळावी म्हणून बरीच मेहनत घेतात.
संजयचे आता थान्याफात याच्याशी चांगले ट्युनिंग जमले आहे. तो म्हणाला की, आता आमच्यात चांगला समन्वय निर्माण झाला आहे. थायलंडचे नागरीक शांत आणि नम्र स्वभावाचे असतात.