बुधवारी आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध 47 धावांची विजयी खेळी साकारणाऱ्या 17 वर्षीय रियान परागने सर्वांचेच लक्ष वेधले. राजस्थानच्या सुरुवातीच्या विकेट्स लवकर गेल्यानंतर डाव सांभाळत राजस्थानला त्याने विजयाचा मार्ग दाखवला. त्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रियानने याचवर्षी 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या पदार्पणाच्या सामन्यात त्याला 16 धावांवर असताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने यष्टीमागे झेल घेत बाद केले होते.
विशेष म्हणजे 19 वर्षांपूर्वी 1999-2000 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत रियानचे वडील पराग दास यांनाही धोनीने यष्टीचीत करत बाद केले होते. त्यावेळी धोनीचे वय 18 वर्षे होते. तसेच धोनीची ही पहिलीच रणजी ट्रॉफी स्पर्धा होती.
धोनी त्यावेळी बिहारकडून खेळत होता. तर आसामकडून पराग दास खेळत होते. तेव्हा बिहार विरुद्ध आसाम संघात जमशेदपूरला झालेल्या सामन्यात आसामच्या दुसऱ्या डावात 30 धावांवर खेळणाऱ्या पराग यांना धोनीने अविनाष कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले होते.
या सामन्यात धोनीची कामगिरीही चांगली झाली होती. त्याने बिहारकडून पहिल्या डावात 40 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावांची खेळी केली होती. या सामन्यात बिहारने 191 धावांनी विजय मिळवला होता.
या सामन्यानंतर आता तब्बल 19 वर्षांनंतरही 37 वर्षीय धोनी यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी करत असून त्याने पराग पिता-पुत्र यांच्या विरुद्ध सामने खेळण्याचा पराक्रमही केला आहे.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी रियानच्या लहानपणीचा धोनीबरोबरील फोटो आणि 11 एप्रिलला झालेल्या सामन्यातील फोटो व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–राजस्थानसाठी विजयी खेळी करणारा रियान पराग झाला असा बाद की कर्णधारही झाला चकीत, पहा व्हिडिओ
–विश्वचषकासाठी संधी न मिळालेला अजिंक्य रहाणे आता खेळणार या संघाकडून
–महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व, असे आहेत सर्व संघ