भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर -गावसकर मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत संपूर्ण क्रिकेट विश्वात भारतीय क्रिकेटची प्रतिमा उंचावली आहे. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होत होती. मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जात होते. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत व विराट कोहलीची पालकत्व राजादेखील अजिंक्यसेनेला रोखू शकली नाही व संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला. विजय जितका मोठा असतो तितकाच संघर्ष देखील महत्वाचा असतो. आपण या लेखात बघणार आहोत भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या 5 खेळाडूंची संघर्षगाथा.
१) कर्णधार अजिंक्य रहाणे –
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या अजिंक्यचा संघर्ष प्रचंड मोठा आहे. क्रिकेट प्रशिक्षणाला जाताना रिक्षासाठी पुरेसे पैसे नसल्याने, अजिंक्य रोज 4 किलोमीटर पायी चालत जात असे. कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची जिद्द व आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास या दोन महत्त्वाच्या गुणांनी अजिंक्यला हे यश मिळाले आहे.
२) रिषभ पंत –
आयआयटीसाठी प्रसिद्ध असलेल्या रुडकी येथे रिषभ वास्तव्याला होता. अगदी लहान वयातच रिषभ क्रिकेटची कोचिंग घेण्यासाठी दिल्लीला प्रवास करायचा. या वेळी तो पैसे नसल्याने अनेक वेळा एखाद्या गुरुद्वारामध्ये आईसोबत राहायचा.
३) मोहम्मद सिराज –
हैदराबाद मधील एका रिक्षाचालकाच्या मुलाने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न बघणेच एक मोठी बाब आहे. पण मोहम्मद सिराजने आपल्या मेहनतीने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असताना वडिलांचे निधन झालेले असून देखील सिराजने भारतात न परतता संघासाठी खेळण्याचे ठरवले. सिराजच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले होते.
४) नवदीप सैनी –
कर्नाल येथील एका बस ड्रायव्हरचा मुलगा असलेला नवदीप एक हजार रुपयांसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. दिल्ली रणजी संघाला नेटमध्ये बॉलिंग करताना गौतम गंभीरने नवदीपचे कौशल्य ओळखले. अत्यंत विरोध सहन करूनही गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिला व त्याने नवदीपला दिल्ली संघात निवडले व पुढे नवदीपनेही जिद्दीने खेळत भारतीय संघात स्थान मिळवले.
५) टी नटराजन –
तमिळनाडू मधील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या टी नटराजनचे वडील एक मजूर आहेत. नटराजनला क्रिकेटची आवड असूनही आर्थिक परिस्थिती त्याच्यासमोर मोठे संकट ठरत होती. गोलंदाजी करण्यासाठी गरजेचे असलेले शूज देखील त्याच्याकडे नव्हते. पण या कठीण परिस्थितीतही त्याने आपली मेहनत कमी केली नाही व अखेर त्याला हे यश मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक
आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने
शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकावले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ