भारतीय संघाने १९३० साली आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर १९७४ साली पहिलावहिला एकदिवसीय सामना आणि २००६ साली प्रथम टी२० सामना खेळला. या कालावधीत भारताकडून अनेक महान दिग्गज फलंदाज होऊन गेले, ज्यात सलामीवीरांचं विशेष वर्चस्व राहीलेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विनू मंकड, लिटल मास्टर सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर सारखे जबरदस्त सलामीवीर होऊन गेले, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर पासून आताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवनचा समावेश सर्वोत्तम सलामीवीर म्हणून केला जातो. टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा व्यतिरिक्त गौतम गंभीर आणि केएल राहुलने सलामीला शानदार कामगिरी केली आहे.
या लेखात आपण आपण तिन्ही क्रिकेट प्रकारातील भारतीय संघाकडून सलामी जोडीकडून करण्यात आलेल्या सर्वोत्तम भागीदारीविषयी जाणून घेऊ.
१. कसोटी (विनू मंकड आणि पंकज रॉय, ४१३ विरुद्ध न्यूझीलंड ,१९५६)
साल १९५६ न्युझीलंड संघाचा भारत दौऱ्यातील पाचवा कसोटी सामना चेन्नईला खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना तीन बाद ५७३ अशी विशाल धावसंख्या उभी केली, त्याला प्रतिउत्तर देतांना न्युझीलंडचा संघ पहिल्या डावात २०९ धावांवर गारद झाला व फॉलो ऑन स्वीकारून दुसऱ्या डावात २१९ धावांवर आटोपला. त्यामुळे त्यांना एक डाव आणि १०९ धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात विनू मंकड (२३१) आणि पंकज रॉय (१७३) या सलामी जोडीने पहिल्या बळीसाठी तब्बल ४१३ धावांची भागीदारी केली जी आजपर्यंत भारताकडून केलेली सर्वोच्च सलामी भागीदारी आहे. याव्यतिरिक्त भारताकडून २००६ साली लोहार येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटीत वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये देखील ४१० धावांची भागीदारी झाली आहे.
२. एकदिवसीय (सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, २५८ विरुद्ध केनिया, २००१)
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात मोठी सलामी भागीदारी करणाऱ्याचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ह्या दिग्गज खेळाडूंच्या नावावर आहे. २००१ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत केनियाविरुद्धच्या सामन्यात सचिन (१४६) आणि गांगुली(१११) यांनी पहिल्या बळीसाठी तब्बल २५८ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. पार्लच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतांना ३५१/३ हे विशाल लक्ष्य केनिया समोर उभे केले होते, त्याचा सामना करताना केनियाचा संघ १६५ धावाच करू शकला .
या भागीदारीव्यतिरिक्त भारताकडून २५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी याच जोडीने १९९८ साली श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे झालेल्या सामन्यात दोघांनी सलामीला येऊन २५२ धावा जोडल्या होत्या.
१. टी२० (रोहित शर्मा आणि केएल राहुल, १६५ विरुद्ध श्रीलंका ,२०१७)
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वात मोठी सलामी भागोदारीचा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांच्या नावावर आहे. २०१७ साली इंदोर येथे झालेल्या टी२० सामन्यात या जोडीने सलामीला येऊन तब्बल १६५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ २६० धावांचा विशाल लक्ष्य उभे करू शकला आणि श्रीलंकेला ८८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात रोहित शर्माने ४३ चेंडूत ११८ धावांची जबरदस्त खेळी केली होती. तसेच त्याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली होती.
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत याव्यतिरिक्त आणखी २ वेळा १५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी भारताकडून झाली आहे. दोन्ही वेळेस ही कामगिरी रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीनेने केली आहे. त्यांनी न्युझीलंड विरुद्ध १५८ आणि आर्यलंड विरुद्ध डब्लिन येथे १६० धावा चोपल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
एक असे अंपायर, ज्यांचा जन्मच ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनला बाद देण्यासाठी झाला होता!
‘उत्साही’ ते ‘प्रतिभासंपन्न’! हरमनप्रीत कौरने कोहली, धोनी आणि रोहितचे वर्णन केले ‘या’ शब्दांत
बासरीवादकानंतर शिखर धवन आता झाला शायर, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल