भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा आणि रियान पराग यांच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्याने म्हटले आहे की त्यांच्या हातातून वेळ निघून जात आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात उथप्पा आणि पराग दोघांच्याही बॅट शांत राहिल्या आहेत. उथप्पाने आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएल हंगामात खेळलेल्या ४ सामन्यात ३३ धावा केल्या आहेत; तर परागने २३ धावा केल्या आहेत.
त्यांच्या या कामगिरीबद्दल गंभीर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, ‘रॉबिन उथप्पा आणि रियान परागसाठी वेळ निघून चालली आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर उथप्पा चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आलेला नाही.’
तसेच तो म्हणाला, ‘रॉबिन उथप्पाने योगदान द्यायला हवे. रॉबिनकडून अनेक अपेक्षा आहेत की तो फिनिशरची भूमीका निभावेल आणि जरी तसे झाले नाही तरी मधल्या फळीला आवश्यक ती मजबूती देईल. त्यामुळे रॉबिनला अपेक्षेनुसार कामगिरी करण्याची गरज आहे.’
याबरोबरच परागबद्दल गंभीर म्हणाला, ‘रियान पराग सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला नाही. नक्कीच त्यांच्याकडे बेंचवर बसलेले काही खेळाडू आहे, त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करावी लागेल आणि बेन स्टोक्स परत आल्यावर संघसंयोजन पूर्णपणे बदलेल.’
तसेच सध्या राजस्थान रॉयल्स फलंदाजीमध्ये वरच्या फळीवर अवलंबून असल्याचेही दिसून आले आहे. याबद्दल गंभीर म्हणाला, ‘त्यांच्यासाठी समस्या आहेत, कारण ते मोठ्या प्रमाणात जॉस बटलर, स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनवर अवंलबून आहेत. जर ते एखाद्या सामन्यात लवकर बाद झाले तर संघासाठी मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे त्यांना मधल्या फळीत सुधारणा करण्याची गरज आहे.’
आत्तापर्यंत आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने ४ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी सुरुवातीचे २ सामने जिंकले तर नंतरचे २ सामने गमावले आहेत. आता त्यांचा पाचवा सामना ६ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.