हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून केदार जाधवने 87 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत केदारने 9 चौकार आणि 1 षटकार मारले. तर एमएस धोनीने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 59 धावा केल्या. त्याचबरोबर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला होता. तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट आणि केदार जाधवने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 7 बाद 236 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते.
या सामन्यात भारताकडून अनेक विक्रम झाले आहेत, ते असे-
-विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील अर्धशतकी भागीदारी ही वनडेमधील 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची केलेली 28 वी भागीदारी होती. त्यामुळे वनडेमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या भारतीय जोड्यांमध्ये रोहित आणि विराटची जोडी चौथ्या क्रमांकावर आली आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी आहे. त्यांनी 55 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
-केदार आणि धोनीमध्ये झालेली 141 धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये पाचव्या विकेटसाठी भारतीय जोडीने केलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी.
-विराट जवळजवळ 6 वर्षांनंतर मायदेशात वनडेमध्ये पहिल्यांदा पायचीत बाद झाला आहे.तो याआधी मायदेशात 13 ऑक्टोबर 2013 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच वनडे क्रिकेटमध्ये पायचीत बाद झाला होता. पुण्यात झालेल्या या सामन्यात वॉटसनने त्याला पायचीत बाद केले होते. म्हणजेच विराट तब्बल 41 डावांनंतर पायचीत बाद झाला आहे.
-धोनीने वनडेमध्ये नाबाद राहत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या जॅक कॅलिसच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. हे दोघांनीही वनडेमध्ये प्रत्येकी 36 वेळा नाबाद राहत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
– धोनी हा भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने भारताकडून 216 षटकार मारले आहेत. तसेच त्याने रोहितच्या 215 षटकारांना मागे टाकले आहे.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे 353 षटकार झाले आहेत. त्याने माहेला जयवर्धनेच्या 352 षटकारांना मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 515 षटकारांसह ख्रिस गेल आहे.
-ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग चार वनडे सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा धोनी भारताचा पाचवा क्रिकेटपटू.
-भारताने हैद्राबादमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामना जिंकला आहे.
-वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीने युवराज सिंगच्या 110 विकेट्सची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता या यादीत युवराजबरोबर शमी 17 व्या क्रमांकावर आला आहे.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीची नाबाद राहण्याची ही 140 वी वेळ.
महत्त्वाच्या बातम्या-
–९९ धावांवर ४ विकेट असतानाही कोहली शास्त्रींना का म्हणाला ‘ही चांगली गोष्ट आहे’, वाचा