भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डापैकी एक आहे. त्यामुळे ज्या खेळाडूची भारतीय संघात निवड होत असते, त्या खेळाडूंवर पैशाचा पाऊस पाडला जात असतो. तसेच, आयपीएल स्पर्धा खेळून देखील हे खेळाडू कोट्यवधी रुपयांची कमाई करत असतात. इतकेच नव्हे तर हे खेळाडू जाहिरातीतून आणि व्यापारातून देखील कोट्यवधी रुपये कमवतात. असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची गणना भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. आता तुम्ही म्हणत असाल, आज आम्ही पैसा आणि श्रीमंतीविषयी का बोलतो आहोत. तर, आजच्या या लेखाचा विषयच तो आहे. आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट क्षेत्रातील ५ सर्वात श्रीमंत असलेल्या क्रिकेटपटूंविषयी सांगणार आहोत. जे सध्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते क्रिकेटपटू?
५) हार्दिक पंड्या –
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा भारतीय वर्तमान संघातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची वार्षिक कमाई ही २९.९ कोटी रुपये इतकी आहे. तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच जाहिरातीतून देखील त्याची चांगलीच कमाई होत असते.
४) रवींद्र जडेजा –
रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात राजस्थान रॉयल्स संघाकडून केली होती. तर सध्या तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. रवींद्र जडेजाला बीसीसीआय कडून दरवर्षी ५ कोटी रुपये मानधन दिले जाते. तर आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात तो ९ कोटी रुपये कमवतो. यासह जाहिरातींमधून आणि व्यवसायातून देखील तो पैसा कमावतो. त्याची एकूण वार्षिक कमाई ७४.८ कोटी रुपये इतकी आहे.
३) आर अश्विन –
भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. आर अश्विनची देखील आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. ए श्रेणीतील खेळाडू असल्यामुळे त्याला बीसीसीआयकडून दरवर्षी ५ कोटी रुपये मानधन दिले जाते. तर आयपीएल स्पर्धेतून देखील तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. त्याची एकूण वार्षिक कमाई ११२ कोटी रुपये इतकी आहे.
२) रोहित शर्मा –
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३ वेळेस दुहेरी शतक झळकावले आहे. वर्तमान काळात रोहित शर्मा १७२ कोटींची दरवर्षी कमाई करतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त तो अनेक फॅशन ब्रँड्सला देखील जोडला गेला आहे
१)विराट कोहली –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची टी२० कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा असणार आहे. दरम्यान सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत देखील विराट कोहली पुढे आहे. वर्तमान काळात विराट कोहली वार्षिक ६८८ कोटी रुपये कमावत असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या काळात हा आकडा वाढू शकतो.