भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघात 2 बदल करण्यात आले असून, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्कीला संघात स्थान देण्यात आले आहे.
पुकोवस्की या सामन्याद्वारे आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणार आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा 460 वा खेळाडू ठरला.
पुकोवस्की मागील बऱ्याच काळापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. पुकोस्कीने खेळलेल्या 24 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने तब्बल 54.50 च्या सरासरीने 1744 धावा केलेल्या आहेत. यावेळी पुकोस्कीने 6 शतक व 5 अर्धशतक देखील झळकावले आहेत.
भारताविरुद्ध सराव सामन्यात दुखापत
कसोटी मालिकेपूर्वी भारताविरुद्धसराव सामना खेळताना पुकोवस्कीला डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे कन्कशनचा त्याला त्रास होत असल्याने कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहाता आले नाही. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून त्याने प्रभावी पदार्पण केले आहे.
त्याने पदार्पणाच्या सामन्यात डेविड वॉर्नरसह सलामीला फलंदाजी केली पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तो 29 चेंडूत 14 धावांवर नाबाद आहे.
विक्रमी भागीदारी –
काही दिवसांपूर्वीच पुकोवस्कीने मार्कस हॅरिससह शेफिल्ड शील्ड या देशांतर्गत स्पर्धेत तब्बल 486 धावांची भागीदारी रचली होती. शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ही कोणत्याही विकेटसाठी रचलेली सर्वोच्च धावांची भागीदारी आहे. याआधी हा विक्रम वॉ बंधूंच्या नावावर होता. त्यांनी 30 वर्षांपूर्वी 1990 ला न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध 464 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचली होती.
या सामन्यात हॅरिस आणि पुकोवस्की यांनी वैयक्तिक द्विशतके केली होती. हॅरिसने 239 धावा केल्या होत्या. तर पुकोवस्कीने 386 चेंडूत नाबाद 255 धावा केल्या होत्या.
कन्कशननंतर द्विशतके –
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कन्कशनचा त्रास होण्याची पुकोवस्कीची पहिलीच वेळ नाही. त्याआधी सन 2018 मध्ये पुकोवस्कीने 2 वेळा कन्कशनचा सामना केल्यानंतर एक महिन्यातच त्याचे पहिले प्रथम श्रेणी शतक केले होते. तसेच मागील दोन वेळेस जेव्हा त्याने कन्कशननंतर पुनरागमन केले होते, तेव्हा त्याने द्विशतके केली होती.