सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 18व्या हंगामात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. या खेळाडूने सोमवारी (28 एप्रिल) गुजरात टायटन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. त्याने अवघ्या 35 चेंडूत शानदार शतक झळकावत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. 14 वर्षीय वैभव आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. पण 10 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची फटेकेबाजी तुम्ही पाहिलीय का?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये 10 वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) उत्कृष्ट फटकेबाजी करताना दिसतोय. हा व्हिडीओ 2021 मधील म्हणजेच लाॅकडाऊन मधील आहे. यामध्ये 10 वर्षांचा वैभव टेरेसवर एमआरएफच्या बॅटने सराव करत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे याच्या 4 वर्षांनंतर, तो आयपीएलमध्ये दुसरा सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू बनला. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने (Chris Gayle) आरसीबीकडून खेळताना 30 चेंडूत शतक झळकावले होते.
A 10 yr old Vaibhav Sooryavanshi practicing on his terrace during the lockdown in 2021
— Vinesh Prabhu (@vlp1994) April 28, 2025
4 years later, becomes the second fastest IPL centurion ❤️🙏#IPL2025 pic.twitter.com/fGdNMGyskA
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) 38 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 7 चौकारांसह 11 षटकार ठोकले. त्याने गुजरातच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत ही ऐतिहासिक कामगिरी केली. एवढ्या कमी वयात वैभवने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चकित केले. आता राजस्थानचा पुढचा सामना चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सशी (1 मे) होणार आहे. या सामन्यात देखील वैभवच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यात त्याला दिग्गज बुमराह आणि बोल्ट या जोडीचा सामना करावा लागेल.