नाशिक | एव्हरशाईन स्पोर्ट्स अकॅडमी आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एव्हरशाईन कप २०१८ या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या एनडीसीए संघाने क्रिकेट क्लब ऑफ नाशिक संघावर चार गड्यांनी मात करत विजेतेपद मिळवले आहे.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेली १५ षटकांच्या सामन्यांची ही स्पर्धा १ जून ते ३ जून पर्यंत महात्मानगर क्रिकेट मैदान आणि संदीप फाउंडेशनच्या क्रिकेट मैदानावर रंगली. अंतिम सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ नाशिक संघाने एनडीसीएच्या संघासमोर १५ षटकांत आठ गाडी गमावत १०४ धावांचे लक्ष्य ठेवले. यात मुझफ्फर सैय्यद १७ धावा, संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिनकर कांबळे २४ धावा, महेश झवेरी यांच्या २४ धावांच्या जोरावर आश्वासक धावसंख्या उभारली. गोलंदाजी करताना एनडीसीएचे कर्णधार शेखर गवळी यांनी टिच्चून गोलंदाजी करताना २.५ षटकांत केवळ ७ धावा देत ३ बळी मिळवले. त्यांना विजय भांबरे २ बळी, महेंद्र देशमुख आणि समीर रकटे (प्रत्येकी १ बळी) यांची साथ मिळाली.
प्रत्युत्तरात समीर रकटे पहिल्याचा चेंडूवर बाद होऊनही बाळू मंडलिक (३० धावा) आणि हर्षल साळुंके (१८ धावा) यांनी किल्ला लढवत ४४ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर विजय भांबरे, शेखर गवळी, शरद इंगळे, विभास वाघ या फलंदाजांनी एनडीसीए संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विजय भांबरे सामनावीर ठरले.
एव्हरशाईन स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना २०१३ साली करण्यात आली आहे. डॉ. अनिरुद्ध भांडारकर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष असून तुषार चव्हाण हे सचिव पदाची धुरा सांभाळत आहेत. वयाची पस्तीशी ओलांडलेल्या औद्योगिक क्षेत्रांतील महारथी, डॉक्टर, अभियंता, सीए, वकील, आदी व्यवसायातील लोक या संस्थेचे सदस्य आहेत. आपापल्या क्षेत्रात यश मिळवताना क्रिकेट खेळायची इच्छा राहून गेलेल्या धुरिणांना क्रिकेट खेळण्याची संधी प्राप्त करून देण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीमुळे कौशल्य असूनही संधी मिळत नसलेल्या उमद्या खेळाडूंना मदत करण्याचेही काम संस्था करत आहे.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत एनडीसीए संघाने द्वारका वेटेरन संघाचा ८७ धावांत खुर्दा उडवत ५४ धावांनी मोठ्ठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर क्रिकेट क्लब ऑफ नाशिक संघाने एव्हरशाईन स्पोर्ट्स अकॅडमीच्या संघासमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र एव्हरशाईन संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना केवळ ८८ धावा करता आल्या.
एव्हरशाईन स्पोर्ट्स अकॅडमी, एनडीसीए, क्रिकेट क्लब ऑफ नाशिक, द्वारका वेटेरन, गर्जना, नाशिक लॉवीयन्स अशा एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला. १ जून रोजी साखळी सामने पार पडले. साखळी सामने अत्यंत चुरशीचे झाले. केवळ १५ षटकांचे सामने असल्यामुळे शेवटपर्यंत खेळाडूंचा उत्साह टिकून राहत होता.
स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे एनडीसीएचे दिनकर कांबळे सर्वोत्तम खेळाडू ठरले. सीसीएनचे फयाझ स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, ब्रिजमोहन लोंगाणी, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम गोलंदाज शेखर गवळी, महेश मालवीय सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनण्याचा मान मिळाला.
पारितोषिक वितरण करण्यासाठी संदीप फाउंडेशन पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अनिल जाधव, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एव्हरशाईनचे संतोष दिंडे, डॉ. दिलीप गांगुर्डे, महेश उपाध्य, विनोद कर्डिले आणि इतरांनी प्रयत्न केले. संदीप फाउंडेशनने या स्पर्धेसाठी आपले मैदान उपलब्ध करून देत खेळाविषयी जाणीव ठेवली आहे.