सध्या भारताचा कर्णधार विराट कोहली हा कारकिर्दीच्या अफलातून फॉर्ममधून जात आहे. काल श्रीलंकेविरुद्ध खेळताना वनडे कारकिर्दीतील विक्रमी ३०वे शतक विराटने केले. असे करताना या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या शतकांची बरोबरी केली.
परंतु आज आयसीसीने आज वनडे क्रमवारी घोषित केली त्यात विराटने आपले अव्वल स्थान अबाधित राखताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या कामगिरीची बरोबरी केली आहे. श्रीलंकेत जबदस्त कामगिरी केल्यामुळे कोहलीच्या खात्यात १४ गुण जमा झाले. त्याचे गुण ८७३ वरून ८८७ वर गेले. भारतीय फलंदाजाने वनडे कारकिर्दीत कमावलेले हे सर्वोच्च गुण आहेत.
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १३ नोव्हेंबर १९९८ साली घोषित झालेल्या क्रमवारीत ८८७ गुण कमावले होते. विराटने याची बरोबरी केली आहे. विराटने हे कामगिरी वयाच्या २८वर्ष आणि ९व्या महिन्यात केली आहे तर सचिनला अशी कामगिरी करायला २५ वर्ष आणि ६ महिने लागले होते. वनडे कारकीर्द सुरु झाल्यापासून दोघांनीही जवळजवळ ९व्या वर्षी हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
काय आहे सार्वकालीन वनडे क्रमवारी
वनडे कारकिर्दीत फलंदाजाने किंवा गोलंदाजाने आयसीसी क्रमवारीत कमावलेल्या गुणांची एक यादी केली जाते. त्यात सार्वधिक गुण मिळवलेल्या खेळाडूंना स्थान दिले जाते. विराट कोहली आणि सचिन या यादीत १४व्या स्थानी आहेत. विंडीजचे व्हिव्हियन रिचर्ड हे या क्रमवारीत अव्वल असून त्यांनी २ डिसेंबर १९८५ साली पाकिस्तान विरुद्ध कारकिर्दीतिल सर्वोच्च गुण अर्थात ९३५ गुण कमावले होते.
सध्या खेळत असलेले केवळ एबी डिव्हिलिअर्स आणि हाशिम अमला यांनी आयसीसीस वनडे क्रमवारीत विराटापेक्षा जास्त गुण मिळवले असून त्यांनी ९००चा टप्पा पार केला आहे.
भारतीय खेळाडूंचे सार्वकालीन वनडे गुण
८८७ विराट कोहली (क्रमवारी -१४ )
८८७ सचिन तेंडुलकर (क्रमवारी – १४)
८४४ सौरव गांगुली २७ (क्रमवारी -२७ )
८३६ एमएस धोनी (क्रमवारी -२९ )
८११ मोहम्मद अझरुद्दीन (क्रमवारी -४३ )
७९४ शिखर धवन (क्रमवारी -५६ )
७८७ युवराज सिंग (क्रमवारी – ६२)
७८४ नवज्योत सिंग सिद्धू (क्रमवारी -६४ )
७७७ कपिल देव (क्रमवारी – ६९)
७७४ वीरेंद्र सेहवाग (क्रमवारी -७३ )
७७३ रोहित शर्मा (क्रमवारी -७४ )
७५१ दिलीप वेंगसकर (क्रमवारी – ८८)
७४९ राहुल द्रविड (क्रमवारी – ९३)
७४४ सुनील गावसकर (क्रमवारी – ९५)