भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला यश मिळवायचे असल्यास विराटच्या बॅटमधून धावा निघणे गरजेचे आहे. मात्र, नॉटिंघम येथील पहिल्या कसोटी सामन्यात विराट ‘गोल्डन डक’ म्हणजे पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आता विराटचा चांगला काळ संपला आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शतकांचा पडला आहे दुष्काळ
दोन वर्षापूर्वी विराट कोहलीकडे ‘रनमशीन’ म्हणून पाहिले जात होते. कोणत्याही परिस्थितीतून संघाला बाहेर काढत तो विजय मिळवून देत. २०१९ पर्यंत त्याच्या नावे ७० आंतरराष्ट्रीय शतके होती. परंतु, त्यानंतर त्याची बॅट चांगलीच थंडावली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत शतक झळकावल्यानंतर आजपर्यंत तो आंतरराष्ट्रीय शतक ठोकून शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो हा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न करेल.
कर्णधार म्हणूनही ठरतोय अपयशी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीनंतर भारतीय संघाच्या कर्णधाराचा काटेरी मुकुट विराटच्या डोक्यावर आला. त्याच्या नेतृत्वात भारताने आजपर्यंत तीन आयसीसी स्पर्धा खेळल्या. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला पाकिस्तानने पराभूत केले. त्यानंतर, २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. चालू वर्षी जून महिन्यात झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सचिन फेरीतही भारताला न्यूझीलंडने पराभूत केले. इतकेच नव्हे तर विराट आपल्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आयपीएलचे विजेतेपदही मिळवून देऊ शकला नाही.
विराटचा चांगला काळ संपला आहे का?
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास विराटचा चांगला काळ संपल्याचे बोलले जात आहे. नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनने त्याला गोल्डन डकवर बाद करत चर्चेला उधाण आणले. आपल्यावर होत असलेल्या सर्व टीकेला आपल्या फलंदाजीने प्रत्युत्तर देण्याची संधी विराटकडे या पाच सामन्यांच्या मालिकेतून असेल. त्यानंतर, पुढील महिन्यात युएई येथे होणाऱ्या आयपीएल व टी२० विश्वचषकात आपल्या संघाला विजयी बनवून कर्णधार म्हणून छाप पाडण्याची संधी त्याच्याकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचा जॉनी बेयरस्टोही झाला “या” भारतीय गोलंदाजाचा फॅन
ज्युनिअर तेंडुलकर करतोय आयपीएल पदार्पणाची जोरदार तयारी; सरावाचे व्हिडिओ केले शेअर
“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा