रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून या सामन्याची आतुरतेने वाट पहिली जात होती. गेल्या काही वर्षातील कामगिरी पहिली तर भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली निराश असल्याचे आढळून आले. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
पाकिस्तान संघाला गेल्या १४ वर्षांपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करण्यात यश आले नव्हते. परंतु रविवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने ही प्रतीक्षा अखेर संपवली. हा सामना झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, “आम्ही जी रणनिती आखली होती, त्या रणनीतीचा आम्हाला अवलंब करता आला नाही. पाकिस्तान संघाने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली. आमचा संघ असा मुळीच नाहीये ज्याची एका पराभवाने धोक्याची घंटा वाजेल. ही स्पर्धेची सुरुवात आहे शेवट नाही.”
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाच्या अवघ्या ६ धावांवर रोहित शर्मा आणि केएल राहुल बाद होऊन माघारी परतले होते. केएल राहुल ३ तर रोहित शर्मा ० धावांवर माघारी परतला. विराटच्या मते, इथून पुनरागमन करणे जरा कठीण होते.
तो पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही सुरुवातीला ३ गडी गमावता तेव्हा पुनरागमन करणे कठीण असते. मुख्यतः तेव्हा जेव्हा तुम्हाला माहीत असतं की, दव या सामन्यात मुख्य भूमिका बजावू शकते. ज्यावेळी तुम्हाला माहित असतं की, परिस्थिती बदलू शकते, त्यावेळी तुम्हाला अतिरिक्त १० -२० धावा कराव्या लागतात. परंतु पाकिस्तान संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.”
या सामन्यानंतर भारतीय संघासमोर आणखी एक मोठे आव्हान आहे. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, “न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आम्हाला विश्रांती मिळणार आहे. ज्यामध्ये आम्हाला या सामन्यासाठी रणनिती आखता येईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO
‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी