आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता. तसेच नामिबिया संघाविरुद्ध झालेला सामना विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला. तो आता वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद पार पाडताना दिसून येणार आहे. तसेच टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो निवृत्ती कधी जाहीर करेल याबाबत देखील त्याने मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने सामना झाल्यानंतर म्हटले की, “माझी आक्रमकता कधीही बदलणार नाही. ज्या दिवशी हे घडेल, मी क्रिकेट खेळणे बंद करेल. कर्णधार होण्यापूर्वीही मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मी नेहमी माझे १२० टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. भारताचा कर्णधार असणे ही अभिमानाची बाब आहे. माझ्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटले. कर्णधारपद ही चांगली जबाबदारी होती.”
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. मायदेशात भारतीय संघ चमकला. यासह परदेशात देखील भारतीय संघाने बलाढ्य संघांना पराभूत केले. विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. परंतु, तो भारतीय वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्वपद पार पाडताना दिसून येणार आहे. तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय टी२० संघाची जबाबदारी रोहित शर्मा पार पाडेल.
नामिबिया संघाविरुद्ध मिळवला जोरदार विजय
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नामिबिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेविड विसेने सर्वाधिक २६ तर स्टीफन बार्डने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामिबिया संघाला २० षटक अखेर ८ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.