युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा स्कॉटलंडशी आमनासामना झाला. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. त्याचवेळी या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.
विराटने पूर्ण केला स्कॉटिश कर्णधाराचा शब्द
दुबई येथे संपन्न झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयानंतर अतिरिक्त उन्माद न करता भारतीय कर्णधार विराट कोहली याने थेट पराभूत झालेल्या स्कॉटलंड संघाचे ड्रेसिंग रूम गाठले. त्याच्यासोबत प्रमुख फलंदाज केएल राहुल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हे देखील उपस्थित होते. त्यांनी काही काळ स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधला. तसेच, युवा खेळाडूंना काही टिप्सही दिल्या. स्कॉटलंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. तसेच, त्याला विराट आणि कंपनीबद्दल आणखी आदर वाढल्याचे कॅप्शन देण्यात आले.
कर्णधाराने व्यक्त केलेली इच्छा
स्कॉटलंड संघाचा कर्णधार व अनुभवी फलंदाज कायले कोएत्झर याने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, विराट कोहली याला सामन्यानंतर आमच्या ड्रेसिंग रूममध्ये पाहायला आवडेल, असे म्हटले होते. त्याचा शब्द विराटने पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. कोएत्झरने अनुभवी खेळाडूंशी बोलून आमच्या युवा खेळाडूंना फायदा होईल असे म्हटलेले. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान यांचे देखील कौतुक केलेले.
भारतीय संघाने मिळवला धमाकेदार विजय
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने स्कॉटलंडचा डाव ८५ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर, रोहित शर्मा व केएल राहुल यांनी तुफानी फटकेबाजी करत केवळ ६.३ षटकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहिला असून, रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर सर्वांची नजर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कुंबळेचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही’, सेहवागने सांगितला जुना किस्सा
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर