मुंबई । भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने संघ प्रशासन आणि खेळाडू यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. “एखाद्या संघ प्रशासनाने प्रमुख अकरा खेळाडूंमध्ये स्थान न दिलेल्या खेळाडूला समावेश न करण्याचे कारण सांगितले पाहिजे. तसेच प्रत्येक खेळाडूने देखील आपल्याला बाहेर का ठेवले आहे? याचे कारणही विचारले पाहिजे. हा खेळाडूंचा हक्क आहे”, असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.
“जेव्हा यष्टिरक्षकचा प्रश्न येतो, तेव्हा वृद्धिमान साहा देशातील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक आहे. त्याची कोणाबरोबरही स्पर्धा होऊ शकत नाही किंवा त्याची तुलनाही करू शकत नाही. साहा सहजपणे खूप दूरपर्यंतचे झेल पकडू शकतो. परंतु त्याची कमजोरी हीच आहे की तो खूप सभ्य आहे, तो काही बोलत नाही. तो त्याचा मुद्दा मांडतही नाही. म्हणूनच संघ त्याच्याबरोबर अशी फसवणूक करतात. कधी खेळवितात कधी नाही. जर, त्याच्या जागी दुसरे कोण असले असते आणि संधी मिळाली नसती, तर तो संघ व्यवस्थापनाशी भिडला असता,” सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला.
क्रिकबझशी बोलताना तो पुढे म्हणाला की, “जर एखाद्या खेळाडूला संघात निवडण्यात आले नाही, तर त्याने प्रश्न विचारले पाहिजे की माझ्यापासून नेमकी काय अडचण आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये असताना मला खेळायची संधी मिळाली नाही, तेव्हा मी संजय बांगर आणि संघ व्यवस्थापनाला विचारले की, आधी मला त्यांनी साडेतीन कोटी रुपयांना विकत का घेतले? खरेदीच केले तर चार सामन्यांनंतर का बाहेर बसविले. जर तुम्ही बाहेरच बसविले, तर तुम्ही घरी का जाऊ देत नाही?”
“पुढच्या हंगामात मी सेवानिवृत्ती घेतली. जेव्हा मॅच विनर खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळण्याची वेळ येते तेव्हा त्याने सेवानिवृत्त होणे अधिक चांगले. पण प्रश्न खेळाडूने विचारलाच पाहिजे. संघातून वगळण्यामागचे कारण विचारणे हा खेळाडूंचा हक्क आहे,” असेही सेहवागने सांगितले.