ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (१५ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. द गॅबा स्टेडियमवर होत असलेला हा सामना भारताच्या २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा सामना आहे. या सामन्यातून २१ वर्षीय वॉशिंग्टन सुंदरने कसोटी पदार्पण केले आहे. याबरोबरच त्याने एक खास कारनामाही केला आहे.
सुंदर भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ३०१ वा खेळाडू ठरला. त्याला ३०१ क्रमांकाची कसोटी पदार्पणाची कॅप भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने दिली. याबरोबर तो भारताकडून सर्वात कमी वयात तीन्ही क्रिकेट प्रकारात खेळणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. याआधी त्याने २०१७ साली टी२० आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ३ वर्षांनी आता त्याने जेव्हा कसोटी पदार्पण केले तेव्हा त्याचे वय २१ वर्षे १०२ दिवस एवढे होते.
भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वात कमी वयात खेळण्याचा विक्रम सध्या इशांत शर्माच्या नावावर आहे. त्याने १ फेब्रुवारी २००८ ला जेव्हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्याचे वय १९ वर्षे १५२ दिवस होते. त्याआधी त्याने भारताचे वनडे आणि कसोटीत प्रतिनिधित्व केले होते. तर त्याच्या पाठोपाठ या यादीत रिषभ पंत आहे. पंतने त्याचे वय २१ वर्षे १७ दिवस असताना तिन्ही क्रिकेट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा कारनामा केला होता. त्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावर सुंदर आला आहे.
स्मिथ ठरला सुंदरची पहिली कसोटी विकेट –
ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथची विकेट घेत कसोटी पदार्पण अविस्मरणीय ठरवलं. स्मिथ ३६ धावांवर ३५ व्या षटकात पदार्पणवीर सुंदरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल रोहित शर्माने घेतला. त्यामुळे स्मिथ हा सुंदरची पहिली कसोटी विकेट ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!
संघसहकारी असावे तर असे! ‘या’ संघाकडून एकत्र खेळले अन् आता टीम इंडियाकडूनही मैदान गाजवण्यास सज्ज