भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आपल्या फलंदाजीसाठी आणि चपळ यष्टीरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. मैदानात असताना क्षेत्ररक्षण सजवायचे असेल किंवा डीआरएस घ्यायचा असेल, या गोष्टीत धोनीचा हात इतर कुठलाही कर्णधार धरू शकत नाही. क्षेत्ररक्षण सजवताना कुठल्या खेळाडूला कुठे उभे करायचे? हे धोनीला चांगलेच माहीत होते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? धोनीने फलंदाजी करत असताना देखील विरोधी संघाचे क्षेत्ररक्षण सजवले होते. हा प्रसंग २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यादरम्यान घडला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक २०१९ स्पर्धेदरम्यान सराव सामना खेळला गेला होता. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. १९ व्या षटकापर्यंत भारतीय संघातील ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर धोनीने धावफलक हलता ठेवला होता.
धोनी फलंदाजी करत असताना बांगलादेश संघाकडून ४० वे षटक टाकण्यासाठी शब्बीर रहमान आला होता. याच षटकात मजेशीर प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले होते. (When Ms dhoni sets field for Bangladesh while batting watch video)
https://www.youtube.com/watch?v=Fo0yDSAISTM&t=9s
या षटकात एमएस धोनी आणि केएल राहुल फलंदाजी करत होते. शब्बीर षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता. त्याचवेळी स्ट्राइकवर असलेला एमएस धोनी बाजूला सरकला आणि लेग साईडच्या दिशेला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे इशारा केला. त्यानंतर शब्बीरने देखील त्या क्षेत्ररक्षकावर संताप व्यक्त केला होता आणि योग्य स्थानी क्षेत्ररक्षण करण्यास सांगितले होते.
या सामन्यात भारतीय संघाने ९५ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला अवघ्या २६४ धावा करण्यात यश आले होते. विश्वचषक २०१९ स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पराभूत केले होते.
महत्वाच्या बातम्या