भारतीय महिला क्रिकेट संघाने अंडर19 महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात, अष्टपैलू खेळाडू गोंगाडी त्रिशाने टीम इंडियासाठी अद्भुत खेळ दाखवला. भारतासाठी गोंगाडी त्रिशाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपली ताकद दाखवली. टीम इंडियाकडून प्रथम गोलंदाजी करताना तिने 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर, फलंदाजीत तिने 44 धावांचे योगदान दिले. या तिच्या शानदार खेळामुळेच टीम इंडिया चॅम्पियन बनली.
गोंगाडी त्रिशा 2023 च्या अंडर19 विश्वचषकातही भारताकडून खेळली होती. 2023 च्या अंडर19 महिला टी20 विश्वचषकात शेफाली वर्मा टीम इंडियाची कर्णधार होती. त्या स्पर्धेतही गोंगाडी त्रिशाने अंतिम सामन्यात अद्भुत कामगिरी दाखवली होती. त्या सामन्यात तिने 24 धावांची खेळी खेळली होती. अशा परिस्थितीत, जाणून घेऊयात गोंगाडी त्रिशा कोण आहे ?
गोंगाडी त्रिशाचा जन्म 2005 मध्ये तेलंगणा (आंध्र प्रदेश) मधील भद्राचलम या छोट्याशा गावात झाला. त्रिशाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी तिच्या वडिलांनी अनेक मोठे त्याग केले. त्रिशाचे वडील भद्राचलममध्ये खाजगी नोकरी करायचे, पण जेव्हा त्यांना दिसले की त्यांची मुलगी क्रिकेटकडे झुकत आहे, तेव्हा त्यांनी त्रिशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडून भद्राचलमहून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
त्रिशाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी, तिच्या वडिलांनी नोकरी सोडली आणि नंतर भद्राचलम सोडून सिकंदराबाद या मोठ्या शहरात गेले. इथेच 7 वर्षांच्या त्रिशाला क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आले. त्रिशाने तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने तिने वडिलांची मेहनत वाया जाऊ दिली नाही. भारतासाठी सलग 2 अंडर19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार खेळी खेळून तिने इतिहास रचला.
यंदाच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्पर्धेमध्ये त्रिशाने भारतासाठी मोलाची भूमिका बजावली. ज्यात तिने 7 डावांमध्ये खेळताना 77.25 च्या सरासरीने 309 धावा केल्या. तितक्याच डावात गोलंदाजी करताना तिने 7 विकेट्स घेतल्या. तिच्या या अष्टपैलू कामिगिरीसाठी तिला मालिकावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा :
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास; रचला ‘हा’ नवा विक्रम
पाकिस्तान संघात ऐतिहासिक बदल, पहिल्यांदाच महिलेला बनवले पुरुष संघाची व्यवस्थापक
स्वप्नपूर्ती.! भारतीय महिला संघाने जिंकला अंडर-19 टी20 वर्ल्डकप, फायनलमध्ये आफ्रिकेला लोळवले