-आदित्य गुंड
एमएस धोनी आणि रोहित शर्मा आज शून्यावर बाद झाले. क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज शून्यावर बाद झाला की त्याला ‘डक’ असे म्हटले जाते. शून्यावर बाद होण्याला नेमकं डक का म्हटलं जातं?
मुळात शून्याचा आकार बदकाच्या अंड्यासारखा असतो म्हणून डक या शब्दाचा प्रयोग सुरु झाला. आकडेवारीच द्यायची तर १७ जुलै १८६६ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स शून्यावर बाद झाला तेव्हा एका वृत्तपत्राने “रिटायर्ड टू रॉयल पॅव्हिलियन ऑन डक्स एग” अशी बातमी दिली तेव्हापासून हा शब्द प्रचलित झाला.
क्रिकेटमध्ये डक शब्दाचादेखील एकाहून अधिक प्रकारे उपयोग केला जातो.
१. पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याला ‘गोल्डन डक’ असे म्हटले जाते.
२. एकही चेंडू न खेळता खेळाडू बाद (नॉन स्ट्रायकर एंडला रन आउट होणे/ वाईड बॉलवर रन आउट किंवा यष्टिचीत होणे) झाला तर त्याला ‘डायमंड डक’ म्हटले जाते.
३. संघाचा पहिला फलंदाज डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर त्याला ‘प्लॅटिनम डक’ किंवा ;रॉयल डक’ असे म्हटले जाते.
४.कसोटीच्या दोन्ही डावांत फलंदाज शून्यावर बाद झाला तर त्याला ‘पेअर’ असे म्हटले जाते.
५. कसोटीच्या दोन्ही डावांत फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला तर त्याला ‘किंग पेअर’ असे म्हटले जाते.
६. जेव्हा फलंदाज हा मैदानावर आल्यावर दुसऱ्या चेंडूवर बाद होतो तेव्हा त्याला सिल्वर तर जेव्हा तिसऱ्या चेंडूवर बाद होतो तेव्हा त्याला ब्राॅंझ डक म्हणतात.
७. संघाच्या डावातील शेवटच्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला लाफिंग डक असे म्हटले जाते.
८. हंगामातील संघाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला गोल्डन गुस असे म्हटले जाते.
क्रिकेटमधील डकबद्दल काही मजेशीर आकडेवारी-
-मारवान आटापटू हा कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २२वेळा डक वर बाद झाला आहे. एखाद्या टाॅप ऑर्डर फलंदाजाच्या नावावर असलेला हा जगातील सर्वात खराब विक्रम आहे. कसोटीत जरी सर्वाधिक वेळा डक होणाऱ्या फलंदाजांत आटापटू १६व्या स्थानी असला तरी पहिले १५ खेळाडू हे गोलंदाज आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना अनेक वेळा फलंदाजीला यावे लागत असल्यामुळे त्यांच्या नावावर हा विक्रम ओघानेच येतो.
-१९९९ साली जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती तेव्हा भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुंबईकर अजित आगरकर चक्क ७ सलग डावात ० धावेवर बाद झाला होता. तेव्हाच त्याला बाॅंबे डक हे नाव देण्यात आले होते.
-भारताकडून खेळताना झहीर खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३वेळा, इशांत शर्मा कसोटीत ३०वेळा, सचिन तेंडूलकर वनडेत २०वेळा तर रोहित शर्मा टी२०मध्ये ६वेळा डकवर बाद झाले आहेत.
-५२ कसोटी सामन्यांत सर डाॅन ब्रॅडमन हे ७वेळा डकवर बाद झाले. यातील सर्वात लक्षात राहणार डक हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात झाला. यामुळे त्यांचे कसोटी कारकिर्दीची सरासरी घसरुन ९९.९४ झाली.
-कर्टनी वाॅल्श हे कसोटीत तब्बल ४३वेळा डकवर बाद झाले आहे तर वनडेत सनथ जयसुर्या हा ३४ वेळा डकवर बाद झाला आहे. श्रीलंका देशाचाच तिलकरत्ने दिलशान टी२० क्रिकेटमध्ये १०वेळा डकवर बाद झाला असून त्याचाच देशबांधव व समकालीन महान क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ५९वेळा डकवर बाद झाला आहे.
-रेग पर्क हा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६ वेळा डकवर बाद झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डकवर बाद झालेले खेळाडू
१. मुरलीधरन – ५९
२. कोर्टनी वॉल्श – ५४
३. जयसूर्या – ५३
४. मॅकग्रा – ४९
५. जयवर्धने – ४७
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ९ वर्षांनी एमएस धोनीवर आली अशी वेळ
–नागपुरच्या भूमीवर किंग कोहली ठरला कूल धोनीला सरस
–जगातील ४८८ कर्णधारांना न जमलेली गोष्ट किंग कोहलीने ६ वर्षांत करुन दाखवली