प्रो कबड्डीमध्ये आज चौथ्या दिवशी दुसरा सामना होणार आहे तेलगू टायटन्स आणि यु.पी.योद्धा या संघामध्ये. तेलुगू टायटन्सचा संघ या मोसमात सर्वाधिक तीन सामने खेळला असून त्यांचा यु.पी.संघाविरुद्धचा होणारा सामना हा मोसमातील चौथा सामना असणार आहे. यु.पी.संघाचा हा प्रो कबड्डीमधील पदार्पणाचा सामना असणार आहे.
यु.पी.च्या संघात या मोसमाचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला नितीन तोमर आहे जो यु.पी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. तर या संघात यु मुंबाचा माजी खेळाडू रिशांक दिवाडीका देखील असणार आहे. सुरेंदर सिंग हा तिसऱ्या रेडरची भुमिका बजावू शकतो. तर राजेश नरवाल हा ऑलराऊंडर खेळाडू यु.पी.संघाची खरी ताकद असणार आहे. राजेश मागील चारही मोसम जयपूर संघाचा महत्वाचा खेळाडू होता. जयपूरचे प्रतिनिधित्व करताना त्याला जयपुर संघासोबत पहिल्या मोसमाचा विजेता होता आले तर मागील मोसमात ते उपविजेते झाले होते.
तेलगू टायटन्सचा संघ मागील दोन्ही सामने हरला आहे. त्यांना हा सामना जिंकून विजयी लयीत परतण्याचे मुख्य आव्हान असेल. हा सामना जिंकण्यासाठी तेलगू टायटन्स संघाला डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करावी लागेल आणि राकेश कुमारला फक्त डिफेन्सिव्ह खेळाडू म्हणून न खेळवता त्याला रेडींगमध्येही कौशल्य दाखवू देण्याची मुभा दिली गेली पाहिजे.
तेलुगू टायटन्स संघाचा हा या मोसमातील चौथा सामना आहे कारण हा संघ यजमान संघ आहे. जर तुमचा संघ यजमान संघ असेल तर जितके दिवस प्रो कबड्डी तुमच्या शहरात असते तितके दिवस तुम्हाला सामने खेळावे लागतात. आजचा सामना जरी तेलगू टायटन्स संघाला गमवावा लागला तरी सर्वाधिक सामने खेळल्याने ते झोन बीमधील गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असतील.