पुणे। भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सुनील कुमार याला पुण्यातील स्वयंसेवी संस्था ‘लक्ष्य’ यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे त्याच्या टॉकीओ ऑलिंपिक मोहिमेला जोरदार पाठबळ मिळाले आहे.
सुनील कुमारला पाठिंबा देण्याची घोषणा लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर, खजिनदार भरत शहा, उपाध्यक्ष सत्येन पटेल आणि खेळाडू व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजित कुंटे उपस्थित होते.
आत्तपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. आगामी महिन्यामध्ये दिल्ली येथे एशियन स्पर्धा होत असून त्यानंतर ऑलिम्पिक पात्रता फेरी होणार आहे. ऑलिम्पिकमधील पदकासाठी ही पात्रता फेरीत यश मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ग्रीकोरोमण कुस्तीपटू सुनील कुमार याने व्यक्त केले.
सुनील कुमार पुढे म्हणाला की, सुरुवातीपासूनच कुस्ती क्षेत्रात सुरुवात केली. माझ्या वडिलांना मी मोठा कुस्तीपटू झाल्याचे पाहायचे होते. माझ्या कुस्तीसाठी त्यांनी जमीन ही गहाण ठेवली होती.
त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ऑलिम्पिकमधील पदक माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. गेल्या बारा वर्षापासून करीत असल्याचे कुस्तीच्या सरावावर इथपर्यंत पोहोचलो असून ऑलिम्पिक पात्रता फेरीतील यश मिळविल्यानंतर ऑलिम्पिक पदकाचे मोठे ध्येय असणार आहे.
परदेशातील एका मल्लाच्या मागे पाच ते सहा संस्था अथवा पाठिंबा देणारे असतात. याउलट आपल्याकडे मल्ल एकटा पडतो. रोजच्या केल्या जाणार्या सरावाच्या जोरावर आणि विविध स्पर्धांतील यशामुळे प्रत्येक खेळाडू पुढे जात असतो.
हे तंत्र मी पाळत आलेलो आहे. रशियन कुस्तीपटू ओलासू हा माझ्यासाठी प्रेरणास्थान असून 87 किलो वजनी गटात मी नक्कीच यश मिळवेल. प्रत्येक खेळाडूला गावपातळीपासूनच योग्य प्रशिक्षण आणि आर्थिक पाठिंबा मिळाला तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके मिळतील.
सरावादरम्यान अथवा स्पर्धांमधून होणार्या चुका दुरुस्त करीत आगामी काळात अधिकाधिक यश मिळवेल आणि ऑलिम्पिकमध्ये नक्कीच भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास सुनील कुमार याने व्यक्त केला.
लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून खेळाडूंसाठी लक्ष्य ही संस्था काम करीत असून तीन वर्षापासून ऑलिम्पिकमधील खेळाडूंना पाठिंबा देत आहे. आत्तापर्यंत 34 खेळाडूंना लक्ष्य ने पाठिंबा दिला असून सुनील कुमार याच्यासाठी कमीत कमी महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्याला सरावासाठी लागणारे साहित्य, आहार आणि फिजिओथेरपी आदिंची सुविधा दिली जाणार आहे.
सुनील कुमार हा टोकियो ऑलिंपिक मध्ये 87 किलोग्राम ग्रेको रोमन गटात सहभागी होणार असून त्याने याच गटात नुकत्याच जानेवारीमध्ये पार पडलेल्या रोम रँकिंग कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.
हरियाणातील डबरपूर येथे जन्मलेल्या सुनीलच्या वडीलांची इच्छा होती, की, त्याने कुस्तीगीर व्हावे. परंतु 2010 मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे सुनीलची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि त्यांना त्यांचे शेतही भाड्याने द्यावे लागले.
अखेर जेष्ठ कुस्तीगीर हरदीप यांच्या सल्ल्यामुळे सुनील कुस्तीक्षेत्रात दाखल झाला. राजस्थान शासनाच्या निदानी येथील क्रीडा शिक्षण संस्थेत त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली आणि नंतर तो रोहटक येथील मेहरसिंग ढाका यांच्या संस्थेत रुजू झाला.
सुनील कुमारने एप्रिल 2019 मध्ये झालेल्या वरिष्ठ आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. तसेच, 2017 व 2018 मध्ये त्याने ज्युनियर आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याआधी 2017 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. 2017,2018 व 2019 अशा सलग तीन वर्षे त्याने राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.
आता नवी दिल्ली येथे फेब्रुवारी 2020 मध्ये वरिष्ठ आशियाई स्पर्धेत ऑलम्पिक पात्रतेसाठी त्याचा कस लागणार आहे. सुनील कुमार ऑलिंपिकसाठी पात्र ठरेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर ऑलिंपिक पदक जिंकण्याची त्याची क्षमता असल्याचे त्यांना वाटते.
फेब्रुवारीत होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी सुनील कुमारला याआधीच प्रवेश मिळाला आहे.