साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारपासून (१९ जून) जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यातील शनिवारचा खेळ तिसऱ्यांदा कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने थांबवण्यात आला आहे. शनिवारचा खेळ थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही कर्णधार-उपकर्णधाराची जोडी नाबाद आहे.
खरंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून (१८ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होणे अपेक्षित होते. परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. मात्र शनिवार रोजी (१९ जून) साउथम्पटनमध्ये ऊन पडल्याने ठराविक वेळेनुसार सुरु झाला.
पहिल्या दोन सत्रातील खेळ नीट सुरु होता. मात्र, दुसऱ्या सत्राच्या अखेरीसपासून कमी प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय येण्यास सुरुवात झाली. तिसरे सत्र सुरु असताना डावाच्या ६५ व्या षटकादरम्यान कमी प्रकाशामुळे तिसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर खेळपट्टी पूर्णपणे झाकण्यात आल्याचेही दिसून आले. अखेर पंचांनी शनिवारच्या दिवसाचा खेळ थांबल्याचे घोषित केले. त्यावेळी विराट ४४ धावांवर आणि रहाणे २९ धावांवर नाबाद खेळत होते.
दुसऱ्यांदा कमी प्रकाशामुळे व्यत्यय
पण तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्यांदा प्रकाश कमी असल्याने सामन्यात व्यत्यय आला. कमी प्रकाशामुळे दुसऱ्या सत्राचा खेळ ५६ व्या षटकादरम्यान थांबवण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने तिसऱ्या सत्रातील खेळ सुरु झाला मात्र, पुन्हा एकदा तिसऱ्या सत्रात जवळपास केवळ ३ षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा कमी प्रकाशाच्या कारणाने खेळ थांबवण्यात आला. तसेच खेळपट्टीवरही कव्हर टाकण्यात आले.
खेळ थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणा्ऱ्या भारताने पहिल्या डावात ५८.४ षटकात ३ बाद १३४ धावा केल्या.
विराट-रहाणेने सावरला डाव
शनिवारी ५६ व्या षटाकादरम्यान खूप अंधार झाल्याने दुसऱ्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला. दुसऱ्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणा्ऱ्या भारताने पहिल्या डावात ५५.३ षटकात ३ बाद १२० धावा केल्या. पुजाराची विकेट गेल्यानंतर रहाणेने विराट कोहलीची भक्कम साथ दिली आहे. दुसरे सत्र संपले तेव्हा या दोघांमध्ये ३२ धावांची नाबाद भागीदारी झाली.
Tea in Southampton ☕️
Bad light brings an engrossing session of cricket to an end with India on 120/3. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/HWCaCiavXm pic.twitter.com/6OMmMi3eRe
— ICC (@ICC) June 19, 2021
भारताच्या ४७ षटकात १०० धावा
शनिवारी दुसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सावध सुरुवात केली होती. त्यांनी कोणताही धोका न पत्करता चेंडू सोडण्यावर अधिक भर दिल्याचे जाणवत होते. या दोघांनी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या १० षटकात केवळ १२ धावा काढल्या होत्या. या दोघांची जोडी खेळपट्टीवर स्थिर झाल्याचे जाणवत असतानाच डावाच्या ४१ व्या षटकात पुजाराला ट्रेंट बोल्टने पायचीत करत भारताला तिसला धक्का दिला. पुजारा २ चौकारांसह ५४ चेंडूत ८ धावा करुन माघारी परतला. तो बाद झाल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी मैदानात आला.
रहाणेने विराटची चांगली साथ देण्यास सुरुवात केली. दरम्यान, ४१ व्या षटकातच विराट बाद होता होता वाचला होता. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेल्या असल्याने झेलबादसाठी न्यूझीलंडने अपील केले होते. मात्र, पंचांनी घेतलेल्या रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे दिसले. विराट आणि रहाणेने भारताला ४७ व्या षटकात १०० धावांचा आकडा पार करुन दिला.
💯 runs up on the board for 🇮🇳
Virat Kohli and Ajinkya Rahane are battling it out in the middle as the @BLACKCAPS keep the pressure up.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/3zFT52GWyD pic.twitter.com/QTEEWCY9cq
— ICC (@ICC) June 19, 2021
पहिल्या सत्रात भारताच्या २ विकेट्स
शनिवारी पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २८ षटकांत २ बाद ६९ धावा केल्या आहेत.
Lunch in Southampton 🍲
After India's solid start, the Kiwis have fought back with two massive scalps!
Which side holds the upper hand?#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/OFtfC8J41k pic.twitter.com/Slqs3fHMqb
— ICC (@ICC) June 19, 2021
भारताची अर्धशतकी सलामी
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही न्यूझीलंडच्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीचा सामना करताना सुरुवात चांगली केली. त्या दोघांनीही सावध खेळ करत काही आक्रमक फटकेही खेळले. याबरोबरच १८ व्या षटकात या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यामुळे ही जोडी आता जमली असे वाटत होते, मात्र त्याचवेळी २१ व्या षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.
काईल जेमिसन विरुद्ध या षटकातील पहिलाच चेंडू खेळताना रोहितच्या बॅटची कड घेऊन चेंडू टीम साऊथीच्या उजव्या बाजूला उडाला. साऊथीनेही कोणती चूक न करता झेप घेत रोहितचा अफलातून झेल घेतला. रोहितने ६८ चेंडूत ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्याने चेतेश्वर पुजारा मैदानात आला.
First breakthrough for the @BLACKCAPS 💥
Kyle Jamieson gets the big scalp of Rohit Sharma!
He is out for 34.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/Yx17nCTHnw pic.twitter.com/nFe8dyX3tD
— ICC (@ICC) June 19, 2021
रोहित बाद झाल्यानंतर काही वेळातच शुबमन गिलदेखील झेलबाद झाला. नील वॅग्नर गोलंदाजी करत असेलल्या २५ व्या षटकात तिसरा चेंडू खेळताना गिल यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगच्या हाती झेल देत बाद झाला. त्याने ६४ चेंडूत २८ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला.
नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून त्यांचा अंतिम ११ खेळाडूंचा संघही जाहीर केला आहे. या संघात इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवणाऱ्या नवख्या सलामीवीर डेवॉन कॉनवेला संधी देण्यात आली आहे. याबरोबरच भारतीयांचे लक्ष लागू असलेला भारतीय मूळ असलेला फिरकीपटू एजाज पटेल याची निवड करण्यात आली नाही. तसेच कर्णधार केन विलियम्सन आणि यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग यांचे पुनरागमन झाले आहे.
दुसरीकडे भारतीय संघाने १७ जून रोजीच अंतिम पथकाची घोषणा केली होती. परंतु सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडल्याने अंतिम ११ जणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु कर्णधार विराट कोहलीने संघात कसलाही बदल न केलेला नाही.
Toss: New Zealand have won the toss and opted to bowl first. #WTC21 #TeamIndia pic.twitter.com/K5SGCGqU88
— BCCI (@BCCI) June 19, 2021
🇳🇿 skipper Kane Williamson has won the toss and elected to bowl first in the #WTC21 Final 🏏#INDvNZ pic.twitter.com/JLUNc8lSrR
— ICC (@ICC) June 19, 2021
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संघ- टॉम लॅथम, डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमिसन, टीम साऊथी, नील वॅग्नर, ट्रेंट बोल्ट