लवकरच भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथम्प्टनच्या मैदानावर हा चुरशीचा सामना पहायला मिळणार आहे. या सामन्यात दोन्हीही संघाना विजयाची समान संधी आहे. कारण भारतीय संघाने गेल्या काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर न्यूझीलंड संघाचा इंग्लंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेद्वारे सराव होणार आहे.
परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे ‘विराट आणि कंपनी’ची चिंता वाढली आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकूण १० वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये ७ वेळेस न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर भारतीय संघाला अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. भारतीय संघाचे २०१९ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न न्यूझीलंड संघांनेच मोडले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला बदला घेण्याची उत्तम संधी आहे.
हे दोन्हीही संघ १९७५ मध्ये पहिल्यांदा कोणत्या आयसीसीच्या स्पर्धेसाठी आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ४ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर १९७९ मध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाला १९८७ मध्ये पहिल्यांदा न्यूझीलंड संघाला पराभूत करण्यात यश आले होते.
भारतीय संघाने १९८७ मध्ये न्यूझीलंड संघाला पराभूत केल्यानंतर त्यांना १९९२ विश्वचषक, १९९६ विश्वचषक आणि २००० मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २००३ विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर ७ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाला एकाही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले नाहीये.
भारतीय संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असली; तरीही आयसीसी स्पर्धांमधील ही आकडेवारी पाहता विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाचे पारडे जड असणार यात काही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सला गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचवणाऱ्या रिषभचे नेतृत्त्वपद धोक्यात!
हौसेला मोल नाही! लेकाच्या क्रिकेट प्रेमासाठी बापाने ५ एकर शेत उपसलं अन् दर्जेदार मैदान बनवलं
गरमागरमी! भर सामन्यात भिडले बांगलादेश आणि श्रीलंकाचे खेळाडू, रंगले शाब्दिक युद्ध