आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ समोरासमोर आले होते. अखेरचा चेंडूपर्यंत अत्यंत नाट्यमय झालेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने विजय आपल्या नावे केला. 215 धावांचा बचाव करण्यात राजस्थानचे गोलंदाज अपयशी ठरले. मात्र, या परिस्थितीतही राजस्थानचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने शानदार गोलंदाजी केली. यासोबत त्याच्या नावे आयपीएलमधील एक मोठा विक्रम देखील जमा झाला.
सातत्याने पराभव पाहत असलेल्या राजस्थानला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करताना 214 धावा धावफलकावर लावून दिल्या. त्याच्या प्रतिउत्तरात हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यावेळी गोलंदाजीला आलेल्या चहलने आपल्या पहिल्या षटकात अनमोलप्रीत सिंग याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात हेन्रिक क्लासेन याला देखील त्याने बाद केले. तर अखेरच्या षटकात राहुल त्रिपाठी व कर्णधार ऐडन मार्करम यांना बाद करण्यात त्याला यश आले. त्याने आपल्या चार षटकात 29 धावा देताना चार फलंदाजांना बाद केले.
मार्करम याला बाद करताच तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरीत्या पहिल्या स्थानी आला. आता चहल व ड्वेन ब्राव्हो यांच्या नावे प्रत्येकी 183 बळी जमा आहेत. सामन्यांचा विचार केल्यास ब्राव्होने हे कामगिरी करण्यासाठी 161 सामने खेळले होते. तर, चहलने केवळ 143 सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला आहे.
या दोघांनंतर तिसऱ्या स्थानी पियुष चावला असून त्याच्या खात्यावर 174 बळी जमा आहेत. त्यानंतर अमित मिश्रा 172 व रविचंद्रन अश्विन 171 बळींसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर विराजमान असलेले दिसतात.
(Yuzvendra Chahal Become Joint WicketTaker In IPL History With DJ Chahal)