पुणे । आर. सुरेश कुमारच्या आक्रमक चढायांच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेमध्ये पाँडिचेरी प्रिडेटर्स हरयाणा हिरोज संघावर 52-28 असा विजय मिळवला. पाँडिचेरीच्या आक्रमणासमोर हरयाणाचा निभाव लागला नाही.
पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या सामन्यात पाँडिचेरी प्रिडेटर्स संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पाँडिचेरीच्या आर. सुरेशकुमारने आक्रमक चढाया करत संघासाठी गुणांची कमाई केली.त्यामुळे पाँडिचेरी संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 12-6 अशी आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये देखील पाँडिचेरीच्या खेळाडूंनी हरयाणा संघाच्या खेळाडूंना गुण मिळवण्याची संधी दिली नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत पाँडिचेरी संघाकडे 30-10 अशी भक्कम आघाडी होती. त्यामध्ये त्यांनी दुस-या क्वॉर्टरमध्ये 18 गुण मिळवले.
तिस-या क्वॉर्टरमध्ये हरयाणाच्या संघाने आपला खेळ उंचावला. त्यांच्या चढाईपटू व बचावपटूंनी गुणांची कमाई केली. त्यांनी तिस-या क्वॉर्टरमध्ये तब्बल 13 गुणांची कमाई केली. या क्वॉर्टरमध्ये पाँडिचेरीला आठ गुण मिळवण्यात यश आले. पण, तरीही 38-23 अशी आघाडी पाँडिचेरीकडे होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये देखील पाँडीचेरी संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवत विजय मिळवला. चौथ्या क्वॉर्टरमध्ये पाँडिचेरीच्या खेळाडूंनी 14 गुणांची कमाई केली.
गुरुवारचे सामने :
दिलेर दिल्ली वि. मुंबईचे राजे ( 8 वाजता)
चेन्नई चॅलेंजर्स वि. तेलुगु बुल्स (9 वाजता)