प्रो कब्बडीमधील पटणा पायरेट्सचा खेळाडू मनप्रीत सिंग ज्याने पटणासाठी कर्णधार म्हणून खेळताना प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवले. तो सध्या गुजरात फॉरचूनजायन्टस संघाचा प्रशिक्षक आहे. हे दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर असण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे या दोन संघात शाब्दिक वाद सुरु झाला आहे.
बेंगाल संघाला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनप्रीतला काही प्रश्न विचारण्यात आले. याला उत्तर देताना तो पटणा पायरेट्स विरुद्ध अंतिम सामन्यात खेळायला खूप उत्सुक असल्याचे जाणवले.
तो पुढे म्हणाला,” स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्ही खूप आत्मविश्वासाने खेळलो आहे. यात शंका नाही की आम्ही चषक जिंकणार. या अगोदर झालेल्या दोन सामन्यात आम्ही प्रदीपला एकदाही सुपर टेन करू दिला नाही. आम्ही खूप बारकाईने विचार करत आहोत की पटणा सोबत आमचा अंतिम सामना व्हावा. कारण त्यामुळे आम्हाला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे खूप सोपे जाईल.”
त्यानंतर पटणा संघाचे प्रशिक्षक राम मेहर सिंग यांना याबाबत विचारले असता ते या बद्दल काही प्रतिक्रिया देण्यात सकारात्मक नव्हते.” पहा, आम्ही दोन वेळचे विजेते आहोत. आम्ही पत्रकार परिषदेत अशी वक्तव्ये करत नाहीत. जर देवाने आणि माझ्या खेळाडूंमुळे जर मला संधी मिळाली तर मी अंतिम सामन्यानंतर मनप्रीत सोबत पत्रकार परिषद राहणे पसंद करेल.
मागील मोसमात आमच्या संघाविषयी अशीच वक्तव्ये करण्यात येत होती, जेव्हा आम्ही साखळी सामन्यात जयपूर पिंक पँथर विरुद्ध दोन्ही सामने गमावले होते. परंतु अंतिम सामन्यात त्यांना आम्ही सहज हरवले.अशी वक्तव्ये जर खेळाडूंनी केली तर ठीक आहे. परंतु जर संघाचे प्रशिक्षक अशी वक्तव्ये करत असतील तर त्याबाबद्दल काय बोलायचे.” असे ते पुढे म्हणाले.
दोन्ही बाजूनी शाब्दिक रान पेटलेले असताना पटणाला २६ तारखेला होणारा बेंगाल वॉरियर्स विरुद्धचा सामना जिंकावा लागेल तेव्हाच ते अंतिम सामन्यात प्रवेश करतील.